शिवसेनेची युतीसाठी भाजपाला टाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 01:15 AM2019-02-23T01:15:13+5:302019-02-23T01:15:30+5:30
भार्इंदर पालिका : स्थायी समितीत अर्थसंकल्प मंजूर
मीरा रोड : लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी भाजपा व शिवसेनेची युती झाली असताना राज्यात एकमेकांची उणीदुणी काढणाऱ्या मीरा-भार्इंदर महापालिकेतही सत्ताधारी भाजपाच्या अर्थसंकल्पास मंजुरी देत शिवसेनेने युतीचा हात पुढे केला आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांची कामे रोखण्यापासून थेट बाळासाहेब ठाकरे कलादालनाचे काम व घोडबंदर किल्ल्याच्या कामाचे भूमिपूजन रखडवण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला गेला. भाजपा व सेनेच्या आमदारांनी तर एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत व्यक्तिगत उणीदुणी काढली. सेनेनेही भाजपाच्या कारभारावर सातत्याने टीकेची झोड उठवत विरोध केला. पण, राज्यात भाजपा व सेनेची युती झाल्यानंतर आता शिवसेनेने महापालिकेतही युतीसाठी हात पुढे केला आहे. त्याचा प्रत्यय गुरुवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत आला.
स्थायी समितीमध्ये अंदाजपत्रकावर चर्चा झाल्यानंतर भाजपाचे हसमुख गेहलोत यांनी मुख्य अंदाजपत्रक मंजुरीचा ठराव मांडला. त्याला शिवसेनेच्या दीप्ती भट यांनी अनुमोदन दिले. अग्निशमन विभागाच्या अर्थसंकल्प मंजुरीचा ठराव भाजपाचे राकेश शाह यांनी मांडला असता त्याला सेनेच्या वंदना पाटील यांनी पाठिंबा दिला. तर, परिवहन उपक्रमाच्या अंदाजपत्रक मंजुरीचा ठराव भाजपाच्या वर्षा भानुशाली यांनी मांडला असता शिवसेनेच्या अनिता पाटील यांनी त्यास अनुमोदन दिले.
भाजपाने मांडलेल्या तीनही ठरावांना सेनेच्या नगरसेवकांनी अनुमोदन दिल्याने भाजपाच्या नगरसेवकांनी आनंद व्यक्त करत स्वागत केले. काँग्रेसच्या जुबेर इनामदार व राजीव मेहरा यांनी मात्र प्रत्येक अर्थसंकल्पाच्या विरोधात ठराव मांडला. परंतु, भाजपाचे नऊ व सेनेचे चार नगरसेवक मिळून युतीचे संख्याबळ १३ झाले. तर, काँग्रेसचे फक्त दोनच नगरसेवक असल्याने युतीचा ठराव बहुमताने मंजूर झाला.
आमदार नरेंद्र मेहतांच्या निकटवर्तीय नगरसेवकाने तर शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. आमच्याकडे बहुमत असल्याने आम्हाला युतीची गरज नाही व नव्हती आणि युती करण्याबाबत स्थानिक वा पक्ष नेतृत्वाकडूनही आदेश नसल्याचे त्या नगरसेवकाने स्पष्ट केले.
सेनेशिवाय काँग्रेस विरोधक म्हणून ठाम उभी
प्रशासनाने अंदाजित केलेल्या उत्पन्नापेक्षाही कमी वसुली होत असताना केवळ अर्थसंकल्प फुगविण्याचे काम सत्ताधाºयांकडून केले जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. शिवसेनेशिवायही काँग्रेस विरोधकांची भूमिका ठामपणे वठवू शकते असे काँग्रेसच्यावतीने सांगण्यात आले. यापुढे पालिकेत सेना काँग्रेससोबत कुठली भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खास करून महासभेच्यावेळी हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजपाकडे स्पष्ट बहुमत आहे. पालिकेत युतीबाबत कोणती चर्चा वा निर्देश नव्हते. पण, शिवसेनेने पाठिंबा दिल्याने आनंदच झाला आहे. सेनेने विकासकार्यास पाठिंबा देऊन आमच्यासोबत असल्याचे दाखवून दिले. एकत्र मिळून चांगली कामे करू. पण, युतीचा निर्णय आमचे आमदार नरेंद्र मेहता घेतील.
- रवी व्यास,
सभापती, स्थायी समिती
विकासाला आणि कायदेशीर प्रस्तावांना शिवसेनेचा पाठिंबा नेहमीच राहिला आहे आणि यापुढेही तो भाजपाला असेल. त्या अनुषंगानेच जे योग्य व जनहिताचे प्रस्ताव आहेत, त्याला पाठिंबा दिला आहे.
- हरिश्चंद्र आमगावकर,
गटनेते, शिवसेना