शिवसेनेतच मुख्यमंत्रिपदासाठी दोन दावेदार?; ठाण्यात शिवसैनिकांची जोरदार बॅनरबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 08:18 PM2019-11-03T20:18:30+5:302019-11-03T20:32:03+5:30
मुंबईपाठोपाठ आता मुख्यमंत्री कोण यासाठी सेनेकडून ठाण्यात पोस्टरबाजी सुरू झाली आहे.
ठाणे : मुंबईपाठोपाठ आता मुख्यमंत्री कोण यासाठी सेनेकडून ठाण्यात पोस्टरबाजी सुरू झाली आहे. मुंबईत देखील सेनेकडून आदित्य ठाकरे आणि भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून पोस्टरबाजी बघितली होती. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेले राजकीय नाट्य काही केल्या संपताना दिसत नाहीये. निवडणूक निकालाच्या आठवडाभरानंतरही शिवसेना-भाजपाचा सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला दिसत नाही.
दोन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदावर अडून बसले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच सुटणे कठीण होत चालला आहे. मात्र, या सर्व घडामोडींवर आता एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवोत, अशी इच्छा मुंबई मराठी वाहतूक व्यापार सेना संघटनेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी पोस्टरवरून व्यक्त केली आहे. दरम्यान, ठाण्यातील कोलबाड परिसरात शिंदे यांचे फलक लागले आहेत. आमच्या ठाण्याचे लाडके ढाण्यावाघ एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवोत हीच आई तुळजा भवानीच्या चरणी प्रार्थना, असे फलक ठाण्यात लागले दिसून येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.