महापालिका स्थायी समिती सभापती पद शिवसेनेकडे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 05:23 PM2020-10-27T17:23:25+5:302020-10-27T17:23:38+5:30
Ulhasnagar : उल्हासनगरात शिवसेनेच्या राजकीय खेळीने भाजपात उभी फूट, स्थायी समिती सदस्य डॉ नाथानी यांचाही राजीनामा
- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका स्थायी समिती सभापती पद राहण्यासाठी सभापती पदासाठी चक्क भाजपच्या विजय पाटील यांना सूचक, अनुमोदन देऊन शिवसेनेने अर्ज दाखल करायला लावला. तर आज भाजपचे स्थायी समिती सदस्य डॉ प्रकाश नाथानी यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने, गुरुवारी होणाऱ्या सभापती पदासाठी शिवसेना समर्थक विजय पाटील यांचा विजय निश्चित झाला आहे.
उल्हासनगर महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असताना महापौर व उपमहापौर निवडणुकीत शिवसेना आघाडीने बाजी मारली. मात्र स्थायी समिती सभापती पद भाजपकडे असल्याने शिवसेनेची कोंडी झाली होती. स्थायी व प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक गुरुवारी होणार असून स्थायी समिती सभापती पद शिवसेनेकडे राखण्यासाठी शिवसेनेला भाजप समिती सदस्य फोडण्यात यश आले. समिती सभापती पदासाठी भाजप कडून जया माखिजा व राजू जग्याशी यांनी तर शिवसेने कडून भाजपचे समिती सदस्य विजय पाटील यांना सूचक व अनुमोदक देऊन अर्ज दाखल केला. स्थायी समितीच्या एकून १६ सदस्या मध्ये भाजपचे ९, शिवसेना-५ व रिपाइं व राष्ट्रवादीचे प्रत्येकी १ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपच्या विजय पाटिल यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केल्याने समिती मध्ये भाजप व शिवसेना आघाडीचे प्रत्येकी ८ सदस्य राहिल्याने, चिट्टी काढून सभापती पदाची निवड होणार असे अटकळे बांधले जात होते.
आजच्या महापालिका महासभा पूर्वी भाजपचे स्थायी समिती सदस्य डॉ प्रकाश नाथानी यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने, भाजपला धक्का बसला. तर शिवसेनेचे समिती मध्ये बहुमत झाल्याने सभापती पदी विजय पाटील यांचा विजय निश्चित झाला. शिवसेनेच्या राजकीय खेळीने भाजपात ऐन स्थायी समिती सभापती निवडणुकी पूर्वी फूट पडल्याने भाजपचे स्थायी समिती सभापती पदाचे स्वप्न भंगले आहे. शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. तसेच भाजप- शिवसेनेची युती महापालिकेत कित्येक वर्ष सत्तेत होते. मात्र थेट पक्षांतर्गत फडाफोडी खासदार शिंदे व कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांनी करून त्यांनी स्थानिक भाजप पक्ष कार्यकर्ता कडून विश्वास गमविल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी केला. भाजपात फाटाफूट करून महापालिका सत्ता काबीज करणाऱ्या शिवसेनेची प्रतिमा शहरात मालिन झाल्याचेही पुरस्वानी यांनी म्हटले.
स्थायी समिती सभापती पद शिवसेनेच्या ताब्यात - गोपाल लांडगे
गुरुवारी स्थायी समिती सभापती पदी शिवसेना समर्थक विजय पाटील यांचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांनी दिली. भाजपला आपले सदस्य सुरक्षित ठेवता येत नसल्याने ती त्यांची चुकी आहे. महापौर व उपमहापौर पद शिवसेना महाआघाडी यांच्याकडे असून स्थायी समिती सभापती पदासह प्रभाग समिती सभापती पदही आघाडीकडे राहणार असल्याचे संकेत लांडगे यांनी दिले.