शिवसेना-जयस्वाल मैत्रीने भाजपा अस्वस्थ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:01 AM2018-02-21T01:01:32+5:302018-02-21T01:01:48+5:30
ठाणेकरांची आपल्या विविध विकास कामांमुळे मर्जी संपादन करणारे आयुक्त संजीव जयस्वाल यांना भाजपाने गेल्या काही महिन्यांपासून लक्ष्य का केले आहे
अजित मांडके
ठाणे : ठाणेकरांची आपल्या विविध विकास कामांमुळे मर्जी संपादन करणारे आयुक्त संजीव जयस्वाल यांना भाजपाने गेल्या काही महिन्यांपासून लक्ष्य का केले आहे, असा सवाल सर्वसामान्य ठाणेकर विचारत आहेत. ठाण्यात शिवसेनेला संपूर्ण बहुमत प्राप्त झाल्यापासून पालकमंत्री एकनाथ शिंदे व जयस्वाल यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित झाले असून नेमकी हीच बाब भाजपाच्या मंत्रालयातील नेतृत्वाच्या नजरेत खुपत असल्यानेच भाजपाच्या स्थानिक नेत्यांना त्यांच्यावर आरोप करण्याकरिता खुले सोडले आहे का, अशी शंका शिवसेनेचे नेते व नगरसेवक व्यक्त करीत आहेत.
महापालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यावर जयस्वाल यांनी शिवसेनेच्या विरोधात कारवाया कराव्या, शिवसेनेला सत्ता राबवण्याची संधी देऊ नये, असा भाजपाचा जयस्वाल यांच्यावर दबाव होता, असे शिवसेनेचे नेते सांगतात. मात्र शिंदे यांनी जयस्वाल यांच्याशी थेट संवाद ठेवून अनेक कामे मार्गी लावली. विधानसभा निवडणुकांपर्यंत शिंदे-जयस्वाल यांचे संबंध असेच मधूर राहिले तर त्याचा फटका आपल्याला बसेल, अशी भीती भाजपाला वाटते. त्यामुळे जयस्वाल यांच्या मागे शुक्लकाष्ठ लावण्यात आल्याचे शिवसेनेच्या नेत्यांना वाटते.
संपूर्ण सत्ता ताब्यात असल्याने सोन्याचे अंडे देणारी ठाणे शहरातील कोंबडीवर शिवसेनेला एकट्यालाच ताव मारायचा असल्याने ते आयुक्तांवर दबावतंत्राचा वापर करीत असल्याचे भाजपाचे म्हणणे आहे. एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांसोबत गुलुगुलु करायचे व महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयुक्तांवर टीकास्त्र सोडायचे, अशी ही मिलीभगत असल्याचे भाजपाचे म्हणणे आहे.
मागील तीन वर्षांत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यात आयुक्त जयस्वाल यांचा मोलाचा वाटा आहे, हे त्यांची टीकाकारही मान्य करतील. रस्ता रुंदीकरण, त्यात बाधीत झालेल्यांना तात्काळ घरे देणे, स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करणे, वाहतूक कोंडीमुक्त ठाण्यासाठी विविध प्रकल्प राबविणे, पारसिक चौपाटी, वॉटर फ्रन्ट डेव्हल्पमेंट, क्लस्टर डेव्हलपमेंट, पूर्वेकडील सॅटीस प्रकल्प, रस्त्यांची जम्बो कामे अशी त्यांनी मार्गी लावलेल्या कामांची मोठी यादी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर सभेत त्यांचे कौतुक केले होते. मात्र जयस्वाल यांची लोकप्रियता वाढल्याने ते नगरसेवक, पत्रकार, मीडिया यांनाही जुमानासे झाले आहेत. आपल्याविरुद्ध टीकेचा ‘ब्र’ काढता कामा नये किंवा मीडियात आपल्या विरुद्ध बोटभर मजकूर प्रसिद्ध होता कामा नये, असा त्यांचा आग्रह असल्याने छोट्या आरोपांनी किंवा साध्या टीकेनेही ते व्यथित होतात, असे त्यांचे निकटवर्तीय अधिकारी खासगीत मान्य करतात. परमार प्रकरणानंतर महासभेत नगरसेवक काय बोलतात यावर लक्ष ठेवण्याकरिता पोलिसांना महासभेत बसायला परवानगी देण्याची विनंती मान्य करणे हा लोकशाहीत लोकप्रतिनिधींच्या अधिकाराचा त्यांनी केलेला संकोच होता, असे काही वरिष्ठ पत्रकार व राज्यघटनेच्या अभ्यासकांचे म्हणणे होते.
राजकारण असो की प्रशासन सार्वजनिक जीवनात असणाºया व्यक्तीवर टीका, आरोप होणे स्वाभाविक आहे. मात्र हे वास्तव पचवण्यात जयस्वाल अपयशी ठरल्याचे त्यांच्या निकटवर्तीय अधिकाºयांचेही म्हणणे आहे. माझ्या कामाचे रिपोर्ट कार्ड हे जनतेच्या मनात तयार असून इतरांच्या सर्टीफिकीटांची गरज नाही, असे जयस्वाल जाहीरपणे सांगतात येथवर ठीक होते. मात्र आपली बदली केली नाही तर एप्रिलपासून रजेवर जाऊ हा त्यांनी दिलेला इशारा हे एकप्रकारे सरकारला व प्रशासनातील वरिष्ठांना दिलेले आव्हान असल्याची कुजबुज सुरु झाली आहे. आपल्या प्रतिमेच्या प्रेमात पडून प्रशासकीय शिस्त धाब्यावर बसवणाºया अधिकाºयांच्या नशिबी वनवास येतो, याची अनेक उदाहरणे असताना जयस्वाल यांच्यासारख्या सक्षम अधिकाºयाने तीच चूक करु नये, असे जाणकार ठाणेकरांना वाटते.
महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि आयुक्तांची विकास कामांसाठी एकत्रित घडी बसल्यानेच भाजपमधील काही मंडळींच्या डोळ्यात खुपत होते. त्यामुळेच त्यांनी आयुक्तांवर वैयक्तिक टीका करुन विकास कामात खोडा घातला आहे.
- नरेश म्हस्के, सभागृह नेते, ठामपा
आयुक्तांवर कुणी वैयक्तिक टीका केली असले तर आयुक्तांनी त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे होते. अशा पध्दतीने वैयक्तिक प्रतिष्ठेचे विषय सभागृहात आणणे चुकीचे आहे. जयस्वाल यांच्याकडून जर योग्य कामे झाली असतील तर त्यांना भीती बाळगण्याचे कारण नाही. त्यांनी संंबंधितांशी संवाद साधून हा विषय संपवावा.
- विक्रांत चव्हाण, नगरसेवक, काँग्रेस
मी जे काही मुद्दे उपस्थित केले आहेत, त्याची उत्तरे आयुक्तांनी द्यावीत, मी काहीच चुकीचे प्रश्न उपस्थित केलेले नाहीत, आयुक्तांना ब्रॅन्ड अॅम्बेसीडर आम्ही नाही तर शिवसेनेनी केले होते. त्यामुळे आयुक्तांवर आज जी वेळ आली आहे ती केवळ शिवसेनेमुळेच आली आहे.
- मिलिंद पाटणकर, गटनेते, भाजपा
भाजपानेच आयुक्तांचा ब्रॅन्ड अॅम्बेसीडर म्हणून वापर केला, आयुक्तांनीही आपल्या भाषणात याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे आयुक्तांवर अशी वेळ येण्यासाठी तेच जबाबदार आहेत.
- मिलिंद पाटील, विरोधी पक्षनेते, ठामपा