आदित्य ठाकरेंनी थेट एकनाथ शिंदेंच्या घरासमोर गाडी थांबवली, अन्...; केदार दिघेही होते उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 02:44 PM2022-07-21T14:44:48+5:302022-07-21T14:45:12+5:30
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज ठाण्यात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधला.
ठाणे- शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी आता शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरेंनी आज थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्राबल्य असलेल्या ठाण्यात जाहीर सभा घेत शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
आदित्य ठाकरे यांचं ठाण्यात विविध ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघेंकडूनही आदित्य ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलं. महत्वाच म्हणजे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरासमोर गाडी थांबवून गर्दी करुन उभे असलेल्या शिवसैनिकांशी संवाद साधला. या संवादानंतर आदित्य ठाकरे पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.
'Shiv Samvad' - the journey of reaching out to every Shivsainik begins... pic.twitter.com/0gvyF2CvJU
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 21, 2022
शिवसैनिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता खाऊन खाऊन अपचन झालेले लोक सोडून गेलेत अशी घणाघाती टीका केली. तसंच जे आज बंड आणि उठाव केल्याचं बोलत आहेत त्यांनी उठाव नव्हे, गद्दारी केलीय असं आदित्य ठाकरे म्हणाले. मी लहानपणापासून बघत आलो आहे. जे लोक हक्कानं घरी यायचे. कामं घेऊन यायचे आणि नवी जबाबदारी मागायचे. कुटुंबातील माणसारखं यांना आजवर शिवसेनेनं सांभाळलं. त्यांनीच आज पाठीत खंजीर खुपसला. ज्या शिवसेनेनं दिलं त्याच पक्षाशी गद्दारी केली, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
दरम्यान, अडीच वर्षाच्या काळात आम्ही कोणताही भेदभाव न करता विकासाची काम करत आलो. २४ तास सेवा करत आलो. या काळात आमचं चुकलं ते म्हणजे आम्ही राजकारण केलं नाही. आपल्याला राजकारण जमलं नाही म्हणून ही वेळ आल्याते आदित्य ठाकरे म्हणाले. आम्ही २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण केले. त्यांच्यावर अंध विश्वास ठेवला म्हणून ते गेले. मात्र, शिवसैनिकांवरचा विश्वास कायम राहणार असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.
हे सरकार कोसळणारच- आदित्य ठाकरे
सध्या सुरू असलेलं राजकारण नाही. ही सर्कस आहे. आज जे निष्ठानंत शिवसेनेसोबत आहेत ते खरे शिवसैनिक आहेत आणि ते घाबरणारे नाहीत. घाबरणारे असते तर सूरतेला आले असते. आज ते ठामपणे शिवसेनेच्या पाठिशी उभे आहेत. हे नवं सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. लिहून घ्या", असा दावाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.