Video: दिवंगत नेते आनंद दिघेंची सवारी पुन्हा रस्त्यावर सुसाट, त्यांची अरमाडा गाडी होती लोकप्रिय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 05:42 PM2022-01-27T17:42:26+5:302022-01-27T17:44:53+5:30
दिघे यांच्या गाडीच्या चालकानं सांगितल्या त्यांच्या आठवणी.
ठाणे : ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे हे जेवढे लोकिप्रय होते, तेवढीच त्याची अरमाडा गाडी लोकप्रिय होती. तेव्हाच्या काळात या चारचाकी गाडीला देखील तितकेच महत्व होते. २००१ साली गणोशोत्सवादरम्यान दिघे यांच्या गाडीला अपघात झाला होता. त्यानंतर तब्बल २० वर्षानंतर त्यांची सवारी आता त्यांच्या जंयत्ती निमित्ताने पुन्हा रस्त्यावर आणण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्नी एकनाथ शिंदे यांनी स्वत: जांभळी नाक्याजवळच्या आनंद मठाजवळ जाऊन या गाडीची पहाणी केली. शिवसेनेकडून गुरुवारी ठाण्यात मोठ्याप्रमाणात आनंद दिघेंची जयंती साजरी केली जात आहे. यंदाच्या जयंतीमध्ये दिघेंची ही गाडी आता खास चर्चेचा विषय ठरली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आता शिवसेनेने त्यांची गाडीच रस्त्यावर आणल्याने ठाणेकरांना आता याच माध्यमातून भावनिक साद घालण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरु झाला का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
बाळासाहबांचे वक्तृत्व आणि व्यक्तिमत्वाकडे आकर्षित झाल्यानंतर आनंद दिघे यांनी ७० च्या दशकात शिवसेना पक्ष मोठा केला. ठाणे जिल्ह्यासह इतर जिल्यात त्यांचे अनेक चाहते होते. दरम्यान दिघे हे आपल्या आरमाडा गाडीतून संपूर्ण दौरा करत असत. ठाणे जिल्ह्यात किंवा जिल्ह्याबाहेर सभा, बैठका काही कामानिमित्त दिघे बाहेर जात असत तेव्हा ते याच गाडीचा वापर करत होते. आता पुन्हा त्या गाडीची डागडुजी करुन शिवसेनेने ती रस्त्यावर उतरवली आहे. या गाडीत दिघे यांचे जे काही साहित्य होते, ते देखील त्यात ठेवण्यात आले आहे. अगदी केसांच्या कंगव्यापासून, सिगारेट ओढण्यासाठीची गाडीतील जागा आणि साहित्यही या गाडीत दिसत आहे.
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघेंची सवारी पुन्हा रस्त्यावर सुसाट pic.twitter.com/5ITpvwjeGv
— Lokmat (@lokmat) January 27, 2022
दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्नी एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने दिघे यांची सवारी पुन्हा रस्त्यावर अवतरली आहे. दुसरीकडे दिघे यांच्या गाडीचे चालक असणाऱ्या गिरीश शिलोत्नी यांनी या गाडीसंदर्भातील आठवणी जागवताना एक रंजक किस्सा सांगितला आहे. दिघे शहरातील शिवसेनेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये फिरण्यासाठी हीच गाडी वापरत होते असे शिलोत्नी म्हणाले. त्यावेळी ठाणे जिल्हा एकच होता. डहाणू लोकसभा मतदारसंघ अगदी इगतपुरीपर्यंत पसरला होता. दिघे याच गाडीमधून संपूर्ण जिल्हा त्यावेळी पिंजून काढायचे असेही त्यांनी सांगितले.
तसेच एकदा या गाडीमधून जात असताना मुंबई अंडरवर्ल्डमधील कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. त्या हल्ल्यामधून ते या गाडीच्या मदतीने कसे वाचले याचा किस्साही शिलोत्नी यांनी सांगितला. तसेच या गाडीतून लालकृष्ण अडवाणी यांनी देखील सवारी केली होती असे सांगत त्यांनी दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान आता ती सवारी पुन्हा रस्त्यावर अवतरली असून येत्या काळात शिवसेनेकडून याच गाडीचा वापर करुन प्रचाराची रणधुमाळी उडविली जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.