आता शिवसैनिक नाही तर नमो सैनिक; शिवसेनेने दिला नारा
By अजित मांडके | Published: February 5, 2024 06:46 PM2024-02-05T18:46:16+5:302024-02-05T18:46:51+5:30
ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत नरेश म्हस्के यांनी नमोचा नारा दिला आहे
ठाणे : आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर हा शिवसेनेचा, तो भाजपचा तो राष्ट्रवादीचा असा भेदाभेद न करता प्रत्येक पक्षातील पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या शब्द खरा करण्यासाठी नमो सैनिक म्हणून काम करावे असा नारा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिला आहे. परंतु त्यांच्या या विधानावरुन ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी निशाना साधत याचसाठी केला होता का? अट्टाहास असा असे ट्विट करत टोला लगावला आहे.
ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत नरेश म्हस्के यांनी नमोचा नारा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाणे, कल्याण डोंबिवलीमध्ये आजही शिवसेना आणि भाजपमध्ये उमदेवारी वरुन तुतु मै मै सुरु आहे. ठाणे लोकसभेवर शिवसेना आणि भाजप या दोघांनीही दावा केला आहे. त्यांच्याकडून इच्छुकांनी त्याची पेरणीसुध्दा केली आहे. परंतु ठाणे लोकसभा कोणाकडे जाणार हे अद्यापही निश्चित नाही. त्यात कल्याणमध्येही शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील कुरबुऱ्या सुरु आहेत. त्यामुळे त्यांच्यात काही प्रमाणात का होईना वितुष्ट निर्माण झाले असून कुरघोडीचे काम सुरु आहे. त्यामुळे महायुतीवर टिका देखील होत आहे. याच संदर्भात म्हस्के यांना छडेले असता, महायुतीच्या माध्यमातून योग्य प्रकारे कामे सुरु आहेत, परंतु काही वेळेस वैयक्तिक पातळीवर काही प्रकार घडत असतात. परंतु त्याचा परिणाम महायुतीवर कुठेही झालेला नाही. या उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातून ४८ जागा निवडून देण्याचा शब्द दिला आहे. आता त्यांनी दिलेला शब्द हा महायुतीमधील प्रत्येक पक्षातील पदाधिकाºयाला लागू आहे. त्यामुळे हा शिवसेनेचा, हा भाजपचा तो राष्ट्रवादीचा असे काम न करता यापुढे नमो सैनिक म्हणूनच काम करायचे आहे, असा नाराच म्हस्के यांनी या निमित्ताने दिला आहे.
परंतु त्यांनी दिलेल्या या नाऱ्याचे ट्विट करत उध्दव ठाकरे शिवसेना गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी म्हस्के यांच्यावर निशाना साधला आहे. याच साठी केला होता अट्टाहास... शिंदेची सेना ही शिवसेना नसून आजपासून नमो सेना आणि नमो सैनिक झाले आहेत. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणारे आहोत असा उठाठेव करणारे आता कोणत्या बिळात लपले आहेत, शेवटी म्हस्केंच्या ओठातले बाहेर पडले, नमो सैनिक झाले आणि यांचा अखेर पडदा उठला अशी टिका त्यांनी केली आहे.