ज्यांना घडवले तुम्ही, त्यांनीच संघटनेचा केला अपमान; विचारेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर डागली तोफ
By अजित मांडके | Published: August 26, 2022 07:21 PM2022-08-26T19:21:30+5:302022-08-26T19:23:39+5:30
धर्मवीर आनंद दीघे यांच्या पुण्यतिथी निमित्त विचारे यांनी आणखी एक व्हिडीओ सोशल मिडियावर पोस्ट केला आहे.
अजित मांडके
ठाणे : ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना मागील काही दिवसांपासून राज्यात सुरु आहे. त्यात काही दिवसांपूर्वी धर्मवीर आनंद दीघे यांनी खासदार राजन विचारे यांनी लिहीलेले पत्र चांगलेच चर्चेचा विषय ठरले होते. त्यानंतर आता दीघे यांच्या पुण्यतिथी निमित्त विचारे यांनी आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत शिंदे गटावर बोचरी टीका केल्याचे दिसत आहे. त्यामुळे ठाण्यात आता शिंदे विरुद्ध विचारे असा सामना रंगणार असल्याचे चिन्हे निर्माण झाली आहेत. 'जेव्हा आपल्यांनीच केली गद्दारी आणि घात करून रातोरात झाले सत्ताधारी. गुरुवर्य तुम्ही म्हणजे अर्जुन घडवणारा द्रोणाचार्य खरा. ज्यांना घडवले तुम्ही त्यांनीच संघटनेचा केलेला अपमान नव्हे बरा आणि म्हणून आमचा आनंद हरपला,' असा संदेश व्हिडीओद्वारे देत विचारे यांनी पुन्हा शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे टीका केल्याचेच दिसत आहे.
दीड महिन्यापूर्वी राज्यात सत्तांतर झाले आणि राज्यात ठाकरे सरकार जाऊन शिंदे, फडणवीस सरकार राज्यात आले. मात्र येथूनच शिंदे विरुद्ध ठाकरे गट असा सामना रंगण्यास सुरवात झाली आहे. अनेक आमदार, खासदार, नगरसेवक हे शिंदे गटात सामील झाले. मात्र काहींनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही. यात ठाण्याचे शिवसेनेचे खासदार विचारे यांचाही समावेश होता. सुरुवातीला त्यांनी या वादात न पडण्याचाच निर्णय घेतला होता. मात्र आता ते देखील उघड उघडपणे शिंदे गटावर टीका करु लागले आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांना लिहलेले पत्र चांगलेच वायरल झाले होते. त्यानंतर आता नवीन व्हिडीओमुळे देखील सध्या शहरात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
आमचा आनंद हरपला असा उल्लेख करत दीघे यांच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला आहे. तसेच शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ‘बाळासाहेब म्हणजे तुमचे कुलदैवत. अंतिम त्यांचा शब्द. तोच ङोलत तुम्ही ठाण्यात भगवा कायम ठेवला. तुम्ही सामान्य शिवसैनिक पेटवला. हिंदुत्वाचा ज्वालामुखी तो तुम्ही जागवला. आमचे सर्वांचे गुरु वर्य तुम्ही. निष्ठेचे दैवत तुम्ही. तुम्ही आम्हापासून दूर गेलात आणि तुटला आम्हाला एकसंघ ठेवणारा दोरा. आमचा आज आनंदच हरपला. गद्दारांना क्षमा नाही म्हणून तुम्ही गरजला. रुद्र अवतार पाहून तुमचा अख्खा महाराष्ट्र हादरला. कसलीच चूक नसताना टाडामध्ये तुरुंगात असताना मागितली असती माफी तर तुम्ही सुटलाही असता. पण निष्ठेच्या दरवाजाजवळ कुठलीच माघार नसते. कुठलेच व्यवहार आणि लोभ नसतात. असते ती केवळ निष्ठा, आत्मसन्मान, समाजाचा उत्कर्ष आणि संघटना. पण जेव्हा आपल्यांनीच केली गद्दारी आणि घात करून रातोरात झाले सत्ताधारी. गुरु वर्य तुम्ही म्हणजे अर्जुन घडवणारा द्रोणाचार्य खरा. ज्यांना घडवले तुम्ही त्यांनीच संघटनेचा केलेला अपमान नव्हे बरा आणि म्हणून आमचा आनंद हरपला,’ असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिंदे गटावर टीका केली.
‘तुमचा प्रवास पाहायला गुरु वर्य (आनंद दीघे) आम्ही, याची देही याची डोळा. श्वासाच्या अंतिम क्षणापर्यंत ही तुम्ही धरली फक्त आणि फक्त सत्याची कास. अखंड शिवसेनेबद्दलची आस. त्याला आघात निष्ठेची साथ. तुम्ही म्हणजे अस्सल मातीतला माणसांसाठी लढणारा माणूस खरा. तुम्ही गेलात आणि शिवसैनिकांत पाझराला अश्रूंचा झरा व आज आमचा आनंदच हरपला’ असे विचारे यांनी चित्निफतीत म्हटले आहे.