उल्हासनगरात पाणी टंचाईच्या विरोधात शिवसेनेचा मोर्चा; '५० खोके, माजले बोके'च्या घोषणा
By सदानंद नाईक | Published: September 23, 2022 05:21 PM2022-09-23T17:21:21+5:302022-09-23T17:21:43+5:30
शहरातील पाणी टंचाई, रस्त्याची दुरावस्था, धोकादायक इमारती आदी मूलभूत समस्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त अजीज शेख यांच्या समोर मांडले.
उल्हासनगर : कॅम्प नं-४ येथील मराठा सेक्शन, ओटी सेक्शन, भीमनगर, संतोषनगर, महादेवनगर आदी परिसरात पाणी टंचाई निर्माण झाल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने महापालिकेवर निषेध मोर्चा काढला. आयुक्त अजीज शेख यांच्यासोबत चर्चा करून निवेदन दिले असून मोर्चात ५० खोके, माजले बोकेच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
उल्हासनगरात ऐन पावसाळ्यात अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली असून महापालिका पाणी टंचाई समस्या सोडविण्यात अपयशी ठरली. कॅम्प नं-४ येथील ओटी सेक्शन, मराठा सेक्शन, भीमनगर, संतोषनगर, बंजारा कॉलनी, महादेवनगर परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली. स्थानिक माजी नगरसेवक धनंजय बोडारे, शेखर यादव, शीतल बोडारे आदींनी याबाबत महापालिकेकडे पाणी टंचाई बाबत पाठपुरावा केला. मात्र त्यानंतरही पाणी टंचाई कायम राहिल्याच्या निषेधार्थ शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना नेते धनंजय बोडारे, माजी नगरसेवक शेखर यादव, शीतल बोडारे, वसुधा बोडारे आदींच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी साडे ११ वाजता ओटी सेक्शन ते महापालिका असा मोर्चा काढण्यात आला.
शहरातील पाणी टंचाई, रस्त्याची दुरावस्था, धोकादायक इमारती आदी मूलभूत समस्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त अजीज शेख यांच्या समोर मांडले. आयुक्तांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वां समक्ष अधिकाऱ्यांना धारेवर धरून पाणी पुरवठा नियमित करण्याचे आदेश देऊन निधीची काळजी करू नका. असे आश्वासन दिले.
ओटी सेक्शन परिसरात येणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर नळ जोडण्यात दिल्याचे उघड झाले असून अश्या नळजोडण्या खंडित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. शिवसेनेचा मोर्चा महापालिकेवर येतांना शिवसैनिक पाणी टंचाईच्या घोषणा कमी, तर ५० खोके माजले बोके या घोषणेने परिसर दणाणून गेला होता. शिवसेनेचे शिष्टमंडळ आयुक्तांना भेटण्यासाठी जात असतानाही ५० खोके, माजले बोके अश्या घोषणेने महापालिका परिसर दणाणून गेला होता. शिवसेनेच्या मोर्चात कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपशहरप्रमुख राजेंद्र शाहू, संदीप गायकवाड, राजू माने, शिवाजी जावळे, माजी नगरसेवक शेखर यादव, शीतल बोडारे, वसुधा बोडारे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.
५० खोक्याच्या घोषणा
शिवसेनेने महापालिकेवर पाणी टंचाईच्या निषेधार्थ मोर्चा काढला. मात्र मोर्चात पाणी टंचाई ऐवजी ५० खोके, माजले बोकेच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला असून शिवसैनिक आक्रमक झाले होते.