शिवसेना शहरप्रमुख भाजपच्या व्यासपीठावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:46 AM2021-08-20T04:46:40+5:302021-08-20T04:46:40+5:30
बदलापूर : केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेनिमित्त बदलापुरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यादरम्यान घोरपडे चौकात ...
बदलापूर : केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेनिमित्त बदलापुरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यादरम्यान घोरपडे चौकात आयोजित सत्काराच्या व्यासपीठावर भाजप पदाधिकाऱ्यांसोबत शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि माजी गटनेते श्रीधर पाटील हेदेखील उपस्थित होते. तेथील त्यांच्या अनपेक्षित उपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.
बदलापूर शहरात गेल्या महिन्यापर्यंत लसीकरणाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला होता. याच मुद्द्यावर शिवसेना आणि भाजप एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपदेखील करीत आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजपतील राजकीय हितसंबंधांत दरी निर्माण झाली होती. ही दरी काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न शिवसेना शहरप्रमुखांनी केला आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित सत्कार समारंभाला थेट भाजपच्या व्यासपीठावर शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे उपस्थित होते. त्यांची ही उपस्थिती अनेकांसाठी अनपेक्षित होती. वादावादीच्या राजकारणानंतर थेट वामन म्हात्रे हे भाजपच्या व्यासपीठावर दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
वामन म्हात्रे आणि श्रीधर पाटील हे दोन्ही शिवसेनेचे स्थानिक नेते भाजप पदाधिकाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याने अनेक राजकीय तर्कवितर्क निर्माण झाले आहेत. कपिल पाटील आल्यानंतर म्हात्रे यांनी शिवसेनेच्या वतीने त्यांचे स्वागत केले, तसेच पाटील यांचा भाजपच्या वतीने सत्कार केला जात असताना वामन म्हात्रे यांचाही सत्कार करण्यात आला. म्हात्रे यांच्या उपस्थितीमुळे गेल्या महिनाभरापासून शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेली राजकीय दरी काही प्रमाणात कमी झाल्याचे बोलले जात आहे.
यासंदर्भात वामन म्हात्रे यांना विचारले असता, खासदार कपिल पाटील हे केंद्रीय राज्यमंत्री झाल्याने त्यांचा राजकीय संबंध राहिलेला नाही. एक मंत्री म्हणून बदलापुरात त्यांचे स्वागत करणे हे शहरप्रमुख म्हणून माझे कर्तव्य होते आणि ते कर्तव्य मी राजकीय हितसंबंध बाजूला ठेवून पार पाडले आहे. कपिल पाटील हे कोणा एका पक्षाचे मंत्री नसून, ते देशाचे मंत्री आहेत, याची कल्पना आम्हाला असल्यानेच आम्ही हा सत्कार केल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.
----------------------