शिवसेना वैद्यकीय कक्षाचं आरोग्यशिबीर, 2250 रुग्णांना मिळाला लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 08:07 PM2020-01-26T20:07:49+5:302020-01-26T20:10:01+5:30
43 रुग्णांवर सोमवारपासून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तर 9 रुग्णांवर अँजिओप्लास्टी/बायपास आदि शस्त्रक्रिया मोफत होणार
उल्हासनगर - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या संयुक्त जयंती दिनानिमित्ताने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा खा. डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशन आणि उल्हासनगर-कल्याण-ठाणे शहर व ग्रामीण भागातील विविध नामांकित हॉस्पिटल आणि विविध डॉक्टर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताकदिनी 26 जानेवारी 2020 रोजी विनामूल्य महाआरोग्य शिबीर पार पडले.
या आरोग्य शिबिराला एकूण 2250 पेक्षा जास्त नागरिकांची मोफत प्राथमिक तपासणी याठिकाणी करण्यात आली. या महाआरोग्य शिबिरात आलेल्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी खासगी तसेच सरकारी रुग्णालयातील 150 डॉक्टर्संची टीम उपस्थित होती. या शिबिरात सर्वसाधारण तपासणी पासून हृदयरोग, कर्करोग, त्वचारोग, मेंदू रोग, स्त्रीरोग, मानसिक आरोग्य, ग्रंथींचे विकार, जेनेटिक विकार, मुत्रविकार, नेत्रतपासणी, अस्थीव्यंग, मधुमेह, श्वसनाचे विकार, कान-नाक-घसा, प्लास्टिक सर्जरी, दंतरोग, लठ्ठपणा, हर्निया, अपेंडिक्स, आतड्यांचे विकार, अस्थीव्यंग उपचार, बालहृदय विकार अशा अनेक आजारांची तपासणी शिबिरात विनामूल्य करण्यात आली व त्यासोबत आवश्यकतेनुसार रुग्णांना मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले.
618 ज्येष्ठ नागरिकांना मोफत चष्म्याचे वाटप
या आरोग्य शिबिरा अंतर्गत 618 जेष्ठ नागरिकांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. तर तपासणी दरम्यान मोतीबिंदू आढळून आलेल्या 43 रुग्णांची सोमवारपासून मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे. सोबतच 9 रुग्णांवर अँजिओप्लास्टी, बायपास, मुतखडा अशा अनेकविविध शस्त्रक्रिया योजनेअंतर्गत मोफत केल्या जाणार आहेत. या शिबिरात अंतर्गत कानांच्या मशिनचेदेखील गरजूंना वाटप करण्यात आले.
या महाआरोग्य शिबिराला खा डॉ श्रीकांत शिंदे तथा महापौर श्रीमती लीलाताई आशण, महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, उल्हासनगर सेन्ट्रल हॉस्पिटलचे डॉ सुधाकर शिंदे यांची विशेष उपस्थिती होती. या महाआरोग्य शिबिराचे आयोजन उल्हासनगर महापालिकेचे नवनियुक्त सभागृह नेते राजेंद्र चौधरी व नगरसेविका राजश्री चौधरी यांनी केले होते. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या परिश्रमामुळे महाआरोग्य शिबिर यशस्वीरित्या पार पडले.