शिवसेना मीरा- भाईंदर विधानसभा विभागप्रमुखांचा राष्ट्रवादीत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 07:48 PM2019-11-22T19:48:50+5:302019-11-22T19:52:07+5:30
शिवसेनेचे मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.
मीरारोड - शिवसेनेचे मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. स्थानिक नागरी समस्यांवर आवाज उठवण्याची जबाबदारी न मिळाल्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे सांगत कदम यांनी सेनेच्या काही स्थानिक पदाधिकारायांवर निशाणा साधला आहे. सेनेचे मीरा भाईंदर जिल्हाप्रमुख पद न मिळाल्याने कदम नाराज होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे असा अरुण कदम यांचा राजकीय प्रवास राहिला असुन त्यांच्या पत्नी शिवसेनेच्या नगरसेविका आहे.
मीरा भाईंदर मध्ये एकाकाळी सत्तेत असणारी तसेच खासदार, आमदार देणाराया राष्ट्रवादी काँग्रेसची शहरात पुरती वाताहत झाली आहे. स्थानिक पातळीवर जनतेसह राजकारण व प्रशासनावर प्रभाव टाकु असेल असा चेहरा व नेतृत्व राष्ट्रवादीत नाही. त्यातच कदम यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांची संतोष धुवाळींसह भेट घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. कदम यांच्या रुपाने शहरात एक नेतृत्व मिळाले असा विश्वास राष्ट्रवादीच्या स्थानिकांकडुन केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापने नंतर कदम यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आधी ते काँग्रेससह विरारचे आमदार हितेंद्र ठाकुर सोबत असायचे. नगरपालिका असताना ते उपनगराध्यक्ष झाले. महापालिका झाल्यानंतर ते शिवसेनेत गेले होते. पण त्यावेळी संपर्क प्रमुख असेलेले विनोद घोसाळकर आणि स्थानिक पदाधिकारी प्रभाकर म्हात्रे यांच्याशी नेतृत्वावरुन खटके उडाल्याने त्यांनी मनसेच्या स्थापने नंतर मनसेत प्रवेश केला. २००७ च्या पालिका निवडणुकीत मनसेचे चार नगरसेवक निवडुन आले व कदम यांना देखील स्विकृत नगरसेवक पद मिळाले.
मनसेत तत्कालिन स्थानिक प्रमुखाxसोबत देखील न जमल्याने मनसे सोडुन कदम पुन्हा शिवसेनेत गेले. कदम यांच्यावर मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघाचे क्षेत्र प्रमुख म्हणुन जबाबदारी देण्यात आली. सेनेच्या स्थानिक प्रमुख नेत्यां पैकी कदम मानले जात होते. सेना नेते रामदास कदम यांचे निकवर्तिय मानल्या जाणाराया अरुण कदम यांना सेनेचे मीरा भाईंदर जिल्हा प्रमुख पद मिळेल असे अपेक्षित होते. परंतु ते पद प्रभाकर म्हात्रे यांच्या पारड्यात पडल्याने कदम नाराज होते.
२०१७ साली झालेल्या पालिका निवडणुकीत कदम यांच्या पत्नी अर्चना भाईंदर पुर्व भागातुन शिवसेनेच्या नगरसेविका म्हणुन निवडुन आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सेनेचे प्रताप सरनाईक यांच्या विजयासाठी काम करतानाच मीरा भाईंदर मतदार संघात भाजपाचे नरेंद्र मेहता यांना धोबीपछाड देण्यासाठी अपक्ष उमेदवार गीता जैन यांचा उघड प्रचार केला होता.
परंतु शिवसेनेतील स्थानिक पातळीवरील प्रोटोकॉल आणि शहरातील नागरी समस्यांवर तसेच पालिकेतील गैरप्रकारांवर आक्रमकपणे लढण्यासाठी अडचन जाणवत होती. त्यामुळेच आपण पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पक्षा कडुन जी जबाबदारी मिळेल त्या नुसार काम करु असे सांगतानाच स्थानिक शिवसेना, काँग्रेस नेतृत्व व कार्यकर्त्यांशी आपले चांगले संबध आजही कायम आहेत असे ते म्हणाले.