शिवसेना आमदार-नगरसेवक भिडले; श्रेयवादावरून पडली ठिणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:25 AM2019-08-06T00:25:07+5:302019-08-06T00:25:15+5:30
नगरसेविकांचीही शिव्यांची लाखोली
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या दोन नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक ठिणगीने रविवारी चांगलाच पेट घेतल्याचे दिसून आले. पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे हे रायलादेवी भागात आपल्या पदाधिकाऱ्यांसमवेत फिरत होते. त्यावेळी नगरसेवक विकास रेपाळे यांनी त्यांच्यासमोर पुन्हा सर्व कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याने संतापलेल्या इतर दोन महिला नगरसेविकांनी पालकमंत्र्यांची पाठ फिरताच त्या नगरसेवकावर शिव्यांची लाखोली वाहिली. त्यात विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांची आणि विकास रेपाळे यांच्यातही हमरीतुमरी झाली.
भररस्त्यात नागरिकांसमोर हा वाद सुरू असल्याने शिस्तबद्ध म्हणून ओळख असलेल्या शिवसेनेचे चांगलेच वाभाडे निघाले. या दोघांमध्ये धक्काबुक्की आणि किरकोळ हाणामारी झाल्याची माहितीही शिवसेना सूत्रांनी दिली. परंतु, त्याचा या दोघांनीही इन्कार केला आहे.
शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने रविवारीसुद्धा ठाण्यात चांगलीच हजेरी लावली होती. त्यामुळे शहरातील अनेक भागांत रहिवाशांच्या घरात पाणी शिरले होते. त्यामुळे नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे हे रायलादेवी आणि आजूबाजूच्या परिसरात आपल्या पदाधिकाऱ्यांसमवेत फिरत होते. त्याच वेळेस भानुशालीवाडी येथे रेपाळे यांनी पुन्हा पुढेपुढे केल्याने त्यांच्या पॅनलमधील मीनल संखे आणि नम्रता फाटक या दोन नगरसेविका नाराज झाल्या. त्यामुळे या प्रकारानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेले स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांनी विकास रेपाळे यांची त्या मुद्यावरून कानउघाडणी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विकास हे त्यांच्यावर काहीसे भडकल्याचे दिसले. हा वाद सुरू असतानाच आमदार रवींद्र फाटक यांनीसुद्धा विकास यांच्यावर आगपाखड केली. या शाब्दिक वादाचे अचानक मारामारीत रूपांतर झाल्याचे शिवसेनेचीच मंडळी सांगत आहे. त्यानंतर, काहींनी मध्यस्थी केल्यानंतर या वादावर पडदा पडला. मात्र पक्षशिस्तीची लक्तरेच निघाली.
श्रेयावरून उडत होते खटके
ठाण्यातील महापालिकेची निवडणूक ही पॅनल पद्धतीने झाली आहे. त्यामुळे एकाच प्रभागातून चार नगरसेवक निवडून आल्यानंतर त्यांच्यात विविध विकासकामांवरून वादविवाद होणे हे नित्याचेच झाले आहे. हाजुरी ते आनंदनगर प्रभागादरम्यानच्या पॅनलमध्ये शिवसेनेचे नरेश म्हस्के, विकास रेपाळे, मीनल संख्ये आणि नम्रता फाटक नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. यामधील विकास रेपाळे यांच्याबरोबर मीनल संख्ये आणि नम्रता फाटक यांचा गेल्या काही महिन्यांपासून विविध विकासकामांवरून वाद सुरू आहेत.
रस्त्यावर स्पीडब्रेकर बसवणे, झाडाच्या फांद्या तोडणे आदी मुद्यावरून त्यांच्यात शाब्दिक खटके उडत होते. मागील आठवड्यात झालेल्या प्रभाग समितीच्या बैठकीत या तिघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली होती. यापूर्वी हाजुरी येथील काही रस्ते आणि शाळेच्या विषयावरून या नगरसेवकांमध्ये शहकाटशहाचे राजकारण रंगल्याची चर्चा होती. त्याचे पडसाद काही प्रमाणात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही उमटले होते. पण, त्यानंतर वरिष्ठ नेत्यांनी तंबी दिल्यानंतर हा वाद शमल्याचे मानले जात होते. परंतु, रविवारी या वादाला पुन्हा फोडणी मिळाली. इतरांनी हस्तक्षेप केल्यानंतर तो थांबला.
बाचाबाची किंवा इतर कोणताही प्रकार नाही
आपले साहेब आल्यानंतर प्रत्येक नगरसेवकाला त्यांच्यासमोर आपली बाजू मांडायची असते. तसाच काहीसा प्रकार यावेळी झाला. परंतु, बाचाबाची किंवा हाणामारी असे काहीही झालेले नाही. शिवाय, हा पक्षातील अंतर्गत विषय आहे. त्यामुळे यावर भाष्य करणे योग्य होणार नाही.
- रवींद्र फाटक, आमदार, शिवसेना
केवळ शाब्दिक बाचाबाची
काही विषयांवरून आमच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आहे. हमरीतुमरी, हाणामारी झालेली नाही. हा विषय एवढा मोठा नाही. घडलेली घटना आम्ही वरिष्ठ नेत्यांना सांगितली आहे. त्यांचा या विषयावरील निर्णय अंतिम निर्णय आहे. हा विषय पक्षांतर्गत असल्याने त्यावर मला अधिक बोलायचे नाही.
- विकास रेपाळ, नगरसेवक
टेंडरच्या १२ टक्क्यांचा घोळ वादाला कारणीभूत
शिवसेनेच्या या शाब्दिक आणि हमरीतुमरीला प्रभागातील टेंडरचा १२ टक्क्यांचा वाद हे प्रमुख कारण असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे
पालिकेने एक टेंडरसुद्धा रद्द केल्याची माहिती पालिका सूत्रांकडून देण्यात आली आहे.