शिवसेना-मनसे वाद, लक्ष विचलित करण्याची खेळी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 01:09 AM2020-08-19T01:09:25+5:302020-08-19T06:51:35+5:30
भाजपला लढतीतून दूर सारण्याकरिता आणि शिवसेना विरुद्ध मनसे अशी लढत होण्याकरिता ही तयारी सुरू आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
ठाणे : ठाण्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या शिवसेना विरुद्ध मनसे यांच्यातील वादाला सोमवारी पूर्णविराम मिळत असतानाच महापौर नरेश म्हस्के यांनी पुन्हा एकदा मनसेवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे हा वाद पुन्हा उफाळून येण्याची चिन्हे आहेत. ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरांमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या अजून कमी झालेली नाही. त्यामुळे कोरोनाच्या प्रकोपावरून नागरिकांचे लक्ष विचलित करण्याकरिता शिवसेना मनसेसोबतचा वाद उकरून काढत आहे की, जिल्ह्यातील महापालिका निवडणुकीत भाजपला लढतीतून दूर सारण्याकरिता आणि शिवसेना विरुद्ध मनसे अशी लढत होण्याकरिता ही तयारी सुरू आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
ठाण्यात मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या विरुद्धच्या कारवाईमुळे दोन्ही सेनांमधील वाक्युद्धाला तोंड फुटले. जाधव यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे राजकारण चांगलेच तापले. सुरुवातीला शिवसेनेतून फारशी तीव्र प्रतिक्रिया आली नाही. परंतु कालांतराने शिवसेनेच्या खासदार, आमदार, महिला आघाडीने आक्रमक भूमिका घेऊन जाधव यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
आता या वादावर पडदा पडला असे वाटत असतानाच महापौर नरेश म्हस्के यांनी पुन्हा वाद उकरून काढला आहे. म्हस्के म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाची लढाई लढली जात असून शिंदे आणि पालिका प्रशासनाने केलेल्या कामामुळेच कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश येत आहे. परंतु या कामात ज्यांचा काडीमात्र संबंध नाही, अशी रस्त्यावरील मंडळी पालकमंत्र्यांवर भुंकण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांची जराही लायकी नाही, नागरिक त्यांना विचारत नाहीत, त्यांनी निवडणुकीत सपाटून मार खाल्ला आहे, नगरसेवक निवडणुकीतही त्यांची हार झालेली आहे. परंतु केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी अशी टीका त्यांच्याकडून केली जात आहे. म्हस्के यांनी जाधव यांचे नाव न घेता, त्यांच्यावर शरसंधान केले आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी चिघळणार किंवा चिघळवला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
दरम्यान, जाधव यांनी केलेल्या टीकेनंतर लागलीच शिवसेनेच्या नेत्यांची प्रतिक्रिया उमटली नाही. एक-दोन दिवसांनंतर खा. राजन विचारे, आ. प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, महिला आघाडी यांनी जाधव यांच्यावर टीका केली. म्हस्के यांनी तर फारच उशिरा तलवार उपसली आहे. ठाण्यातील स्व. आनंद दिघे यांची शिवसेना विरोधकांच्या टीकेची अशी सवडीने दखल केव्हापासून घेऊ लागली, अशी चर्चा जुने शिवसैनिक करू लागले आहेत.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससोबत हातमिळवणी करून शिवसेनेने महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. या सरकारच्या विरोधात मनसेने तीव्र विरोधी भूमिका घेतलेली नाही. अलीकडेच मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा करताना सरकारच्या विधायक निर्णयांना पाठिंबा देण्यास राज यांनी बजावले होते.
लॉकडाऊन जाहीर झाला तेव्हा राज यांनी सरकारच्या काही निर्णयांना पाठिंबा दिला होता व त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज यांचे जाहीर आभार मानले होते. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यावरून शिवसेना-भाजपमध्ये खडाखडी सुरू असताना मनसेने शिवसेनेच्या परीक्षा न घेण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. त्यामुळे दोन्ही सेनांनी गेल्या पाच महिन्यांत अनेकदा परस्परपूरक भूमिका घेतल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत राज यांनी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. त्यानंतर दादरच्या कोहिनूर गिरणीच्या व्यवहारात मनसे नेत्यांमागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लागले व आता ते शांत झाले आहे. अगदी अलीकडे जिम व देवळे सुरू करण्याबाबत राज ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेत साधर्म्य राहिले आहे. या दोन्ही बाजू विचारात घेता मनसेचा येत्या महापालिकेतील राजकीय निर्णय अजून पक्का झालेला नाही. ठाणे जिल्ह्यात भाजपकडे एकच प्रभावशाली नेता नाही. त्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली वगैरे शहरांत शिवसेना विरुद्ध मनसे अशी लढत झाल्यास भाजपला मैदानातून हद्दपार करणे शक्य आहे, अशी चर्चा आहे. त्या दिशेने टाकलेले हे पाऊल असू शकते. समजा भाजपने दिल्लीतून ईडी चौकशीची कळ दाबून मनसेला महापालिका निवडणुकीत सोबत येण्यास भाग पाडलेच, तर तूर्त या वादामुळे कोरोनाच्या उद्रेकावरू
न नागरिकांचे लक्ष विचलित करण्याचा तात्कालीक लाभ सत्ताधारी शिवसेनेला होणार आहेच.
>मनसेचा वाद स्थानिक स्तरावर निवळला की ‘कृष्णकुंज’वरून?
सोशल मीडियात शिवसेना आणि मनसेमध्ये झालेल्या राजकीय वादविवादाची चर्चा चांगलीच रंगली. यानिमित्ताने शहरभर शिवसेना आणि मनसेमध्ये बॅनरवॉरही रंगले. जाधव यांच्या टीकेनंतर मनसेचे समर्थन केले म्हणून एका तरुणाला मारहाण करून शिवसैनिकांनी त्याच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.गणेशोत्सवाच्या तोंडावर वाद चिघळायला नको म्हणून अविनाश जाधव यांनी या वादावर पडदा टाकण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. अर्थात जाधव यांनी स्वत:हून या वादावर पडदा पाडला की, थेट कृष्णकुंजवरून त्यांना तसे आदेश दिले गेले, हे अद्यापही उघड झालेले नाही. राजकीय वर्तुळात याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर सुशांतसिंह राजपूत प्रकरणात भाजपने आरोप केल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आदित्य यांच्या पाठीशी मनसे असल्याचे अलीकडेच जाहीर केले. त्यामुळे कदाचित राज यांनीच जाधव यांच्या आक्रमकतेला वेसण घातली असण्याची शक्यता
आहे.