कोलबाड दुर्घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा; राजन विचारेंची पालिका आयुक्तांकडे केली मागणी
By जितेंद्र कालेकर | Published: September 12, 2022 07:11 PM2022-09-12T19:11:38+5:302022-09-12T19:12:25+5:30
कोलबाड येथील दुर्घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची तसेच मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना शासनाकडून ३० लाखांची मदत देण्याची मागणी शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोलबाड येथील दुर्घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची तसेच मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना शासनाकडून ३० लाखांची मदत देण्याची मागणी शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे पत्राद्वारे केली. कोलबाड येथील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपावर झाड पडून राजश्री वालावलकर या महिलेचा मृत्यू झाला. उन्मळून पडलेल्या पिंपळाच्या झाडाच्या फांद्या छाटण्यासाठी संबंधित सोसायटीने पत्र देऊनही पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने कारवाई न केल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला.
कोलबाड येथील मंडपावर पिंपळाचे मोठे झाड पडून वालावलकर या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. ९) रात्री घडली. या दुर्घटनेत वालावलकर यांच्यासोबत त्यांचा मुलगा प्रतीक (३२) आणि काव्हिन्सी परेरा (४०), सुहासिनी कोलुगुंडे (५६) आणि दत्ता जावळे (५०) असे चौघे गंभीर जखमी झाले.
या पिंपळाच्या झाडापासून मनुष्यहानी होऊ नये यासाठी झाडाच्या फांद्या छाटून किंवा महापालिकेच्या यंत्रणामार्फत मुळासकट काढण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. यापैकी पहिला अर्ज २४ मे २०२१ रोजी केला होता. ७ जुलै २०२२ पर्यंत चार पत्रे दिली. परंतु ठामपाच्या वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हे पिंपळाचे झाड कोलबाड मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपाच्या शेडवर पडून महिलेला आपला प्राण गमवावा लागला.
शासनाकडून ३० लाखांच्या मदतीची मागणी...
खा. विचारे यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना शासनाकडून ३० लाखांच्या मदतीची मागणी केली.