शिवसेनेला नडली बेफिकिरी; केडीएमसी स्थायी समितीवर भाजपचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:20 AM2020-01-04T00:20:14+5:302020-01-04T00:20:34+5:30
शिवसेना, काँग्रेस करणार नगरसेवकांवर कारवाई
कल्याण : केडीएमसीतील स्थायी समिती सभापतीपदासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत भाजपने बाजी मारत शिवसेनेला जोरदार धक्का दिला. गेल्या पाच वर्षांत महापालिकेतील सत्ता समर्थनार्थ भाजपला शिवसेनेने दिलेला शब्द ठाण्याच्या नेतृत्वाने पाळला नाही, असा निशाणा भाजप नेतृत्वाने साधत शिवसेनेला अद्दल घडविल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, शिवसेनेच्या नेतृत्वाने अशा प्रकारचा काही शब्दच आम्ही दिला नव्हता. त्यामुळे तो पाळण्याचा प्रश्नच येत नाही, असा खुलासा केला आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला हा एक प्रकारे मोठा धक्का मानला जात आहे.
स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे विकास म्हात्रे हे मनसे व काँग्रेस सदस्यांच्या पाठबळावर निवडून आले. या निवडणुकीत किंगमेकर ठरलेले भाजप आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले की, केडीएमसीची २०१५ ची निवडणूक शिवसेना-भाजप विरोधात लढली. त्यानंतर, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र आणि राज्यातील युतीचा विचार करता महापालिकेत युती केली. त्यावेळी एक वर्ष महापौरपद आणि दोन वेळा स्थायी समितीपद भाजपला देण्याच्या वाटाघाटी झाल्या होत्या. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर ठाणे व उल्हासनगरच्या निवडणुकीत शिवसेनेने शब्द पाळला नाही. केडीएमसीतही एक वर्ष महापौरपद भाजपला दिले नाही. स्थायी समिती सभापतीची निवडणूक जाहीर झाल्यावर शिवसेनेच्या ठाण्याच्या नेतृत्वाशी आम्ही वारंवार संपर्क साधला असता, चर्चा करून बघू, असे सांगण्यात आले. आता सत्याचा विजय झाला आहे, असे चव्हाण म्हणाले.
शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे म्हणाले की, शिवसेनेचे सदस्य वामन म्हात्रे हे गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात पक्षाकडून कारवाई केली जाणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचा पॅटर्न असला, तरी तो महापालिकेत लागू होईल, असे काही नाही. त्याचबरोबर चव्हाण यांनी पदवाटपाच्या वाटाघाटीचा मुद्दा उपस्थित केला असला, तरी तो मुद्दा धादांत खोटा आहे. अशा प्रकारे पदे वाटून घेण्याचे ठरलेले नव्हते. त्यांना स्थायी समिती सभापतीपद दोनवेळा दिलेले आहे. सध्या उपमहापौरपदी भाजपच्या उपेक्षा भोईर विराजमान आहेत. उपमहापौरपदाचा राजीनामा त्यांनी दिल्यास आम्ही भाजपला महापौरपद देण्याचा विचार केला असता, असे लांडगे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शिवसेनेचे सदस्य वामन म्हात्रे यांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे ते निवडणुकीला उपस्थित राहू शकलेले नाही. सभापतीपदासाठी तेदेखील दावेदार होते. म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले असून, त्यात मी आजारी असल्याने निवडणुकीस उपस्थित राहिलो नाही. मी पक्ष व आपल्या नेतृत्वाविरोधात नाही. मला माझी बाजू मांडण्याची संधी द्यावी, असे म्हटले आहे. १० वर्षांत पक्षातील काही स्वयंभू नेत्यांनी मला संपविण्याचे काम केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
मनसेचे गटनेते मंदार हळबे म्हणाले, शिवसेनेचा पराभव ही येत्या महापालिका निवडणुकीकरिता नवी नांदी ठरू शकते. परिस्थितीनुसार हा निर्णय घेतला आहे. महापौर विनिता राणे म्हणाल्या की, वामन म्हात्रे यांनी रक्ताच्या उलट्या सुरू असल्याने निवडणुकीच्या दिवशी उपस्थित राहता येणार नाही, असे पत्र माझ्याकडे दिले होते.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे म्हणाले की, पक्षाच्या सदस्या हर्षदा भोईर यांना पक्षादेश बजाविण्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून मला अधिकार नसला तरी, हर्षदा यांना पक्षादेश बजविण्याचे गटनेते नंदू म्हात्रे यांना सांगितले होते. त्या आशयाचे पत्र व कोणाला मतदान करायचे, याविषयीची सूचना त्यांना करण्यात आली होती. त्यांना ती मिळालीही होती. मात्र, त्यांनी वैयक्तिक आणि आर्थिक स्वार्थासाठी पक्षाचा आदेश मानलेला नाही. त्यामुळे गटनेते म्हात्रे व हर्षदा यांच्याविरोधात कारवाई करावी. म्हात्रे यांचे गटनेतेपद काढून घ्यावे, तर हर्षदा यांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशा आशयाचा अहवाल प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना पाठविण्यात येणार असल्याचे पोटे यांनी सांगितले.
राज्यातील पॅटर्नमुळे गाफील
महाविकास आघाडीच्या पॅटर्नमुळे शिवसेना गाफील राहिली. गृहमंत्री शिंदे हे राज्याच्या राजकारणात व्यस्त असल्याने त्यांना केडीएमसीतील स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी वेळ देता आला नाही. त्यामुळे शिवसेनेला गाफीलपणा नडला आहे. आगामी महापालिकेची निवडणूक पाहता अशा प्रकारचा गाफीलपणा पक्षाला नडू शकतो.
गणेश कोट यांचा बॅनरवरील खर्च वाया
कोट हे सभापतीपदी निवडून येणार, याची शिवसेनेला १०० टक्के हमी होती. त्यामुळे कोट यांच्या समर्थकांनी कोट यांच्या निवडीचे बॅनर आधीच तयार करून ठेवले होते. मात्र, त्यांचा पराभव झाल्याने बॅनरवरील खर्च वाया गेला आहे.
कोट यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे. मागच्या वेळेस त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती. त्यांची ही संधी भाजपने हिसकावून घेतली आहे.
भाजपकडून घोडेबाजार
मनसे आणि काँग्रेसने भाजपला मतदान केले. भाजपकडून घोडेबाजार झाल्याने त्यांचा विजय झाला आहे. घोडेबाजार झाल्याची चर्चा निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच दालनाच्या बाहेर सुरू होती. त्यामुळे काँग्रेसच्या सदस्या निवडणूक पार पडताच गर्दीतून मार्ग काढत निघून गेल्या.