उल्हासनगर महापालिका परिवहन समिती सदस्य निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 05:44 PM2021-12-15T17:44:47+5:302021-12-15T17:45:01+5:30
उल्हासनगर महापालिका परिवहन समितीच्या निवृत्त ६ सदस्यासाठी मंगळवारी ५ वाजता निवडणूक झाली.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका परिवहन समितीच्या निवृत्त झालेल्या ६ सदस्यांच्या जागी मंगळवारी सायंकाळी निवडणूक होऊन शिवसेना-राष्ट्रवादी पक्षाने बाजी मारत ४ सदस्य निवडून आले. तर बहुमताचा दावा करणाऱ्या भाजपचे २ सदस्य निवडून आले असून रिपाइं व साई पक्षाचे सदस्य पराभूत झाले.
उल्हासनगर महापालिका परिवहन समितीच्या निवृत्त ६ सदस्यासाठी मंगळवारी ५ वाजता निवडणूक झाली. सहा जागेसाठी ८ जण निवडणूक रिंगणात उतरल्याने, निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता निर्माण झाली होती. शिवसेनेचे परमानंद गिरेजा, भुपेंद्र साळवी, राजू घडियाल, भाजपचे सुभाष तनावडे, दिनेश पंजाबी तर राष्ट्रवादी पक्षाचे निर्मल धमेजा परिवहन समिती सदस्य पदी निवडून आले. तर रिपाई व साई पक्षाचे सदस्य पराभूत झाले. समिती सदस्य निवडीनंतर समिती सभापती पदाची निवडणूक होणार असून सभापती पद शिवसेनेकडे पुन्हा राष्ट्रवादी कडे? असा प्रश्न विचारला जात आहे. भाजप नगरसेवकांनी क्रोसिंग मतदान केल्याने, शिवसेनेचे ३ सदस्य निवडून आल्याचा दावा शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला. तर भाजपने शिवसेनेचा दावा खोडुन काढला. महापालिका परिवहन बस सेवा गेल्या ७ वर्षा पासून बंद पडल्याने, सामान्य नागरिकांचे हाल होत आहे.
अखेर उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्या पुढाकाराने परिवहन बस सेवा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली. महापालिका ठेकेदारा मार्फत बस सेवा सुरू करण्याची निविदा प्रक्रिया सुरू केली. नवीन वर्षात महापालिकेची परिवहन बस सेवा सुरू होण्याचा मानसही नाईकवाडे यांनी व्यक्त केला. सद्यस्थितीत परिवहन बस सेवा बंद असल्याने, लाखो रुपये खर्च होणाऱ्या परिवहन समितीला बरखास्त करण्याची मागणी यापूर्वी झाली. ओमी कलानी, माजी महापौर व राष्ट्रवादी पक्ष्याच्या शहराध्यक्षा पंचम कलानी, मनोज लासी, कमलेश निकम आदींनी राष्ट्रवादी पक्षाचा एक उमेदवार समिती सदस्य पदी निवडून आल्याचे सांगून महाआघाडीची नेते सभापती पदासाठी बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे प्रतिक्रिया दिली.