कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेतर्फे रमेश म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 01:25 AM2019-10-05T01:25:40+5:302019-10-05T01:25:56+5:30
कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेतर्फे विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना एबी फार्म मिळाल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता.
कल्याण : कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेतर्फे विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना एबी फार्म मिळाल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. सोबतच, या मतदारसंघाचे प्रबळ दावेदार शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांनाही पक्षाने एबी फार्म दिल्याने त्यांनीदेखील शुक्रवारी शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज भरला आहे. शिवसेनेकडून दोन उमेदवारांचे अर्ज आल्याने, शनिवारी अर्ज छाननीपश्चात कुणाचा अर्ज वैध ठरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
रमेश म्हात्रे यांनी शुक्रवारी दुपारी उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्यासोबत शिवसेनेचे कल्याण तालुकाप्रमुख एकनाथ पाटील यांच्यासह ठाण्याचे उपमहापौर रमाकांत मढवी, कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनीता राणे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे आदी उपस्थित होते.
पक्षाने म्हात्रे यांना अधिकृत उमेदवारी दिल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारीच जाहीर केले होते. म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खासदार शिंदे हेदेखील आले होते.
यावेळी म्हात्रे म्हणाले की, पक्षाने भोईर यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यांचा वेगळा विचार पक्षाकडून केला जाणार आहे. त्यांच्याकडे सध्या असलेल्या जबाबदारीपेक्षा मोठी जबाबदारी पक्षाकडून दिली जाऊ शकते. शिवसेनेत नाराजी असू शकते; मात्र आदेश आल्यावर पक्षाचे काम शिवसैनिक करतो. त्याप्रमाणे भोईर हेदेखील मला निवडून आणण्यासाठी पक्ष आदेशानुसार काम करतील.
खासदार शिंदे यांनी सांगितले की, म्हात्रे यांना उमेदवारी दिल्याने भोईर हे नाराज असतील, तर त्यांची नाराजी दूर करण्याचे काम पक्षाकडून केले जाईल. एकाच जागेसाठी अनेक जण इच्छुक असतात. पण, सगळ्यांना उमेदवारी देता येत नाही.
दरम्यान, पक्षातर्फे अधिकृत उमेदवार कोण, हे अर्ज छाननीपश्चात स्पष्ट होणार असल्याचे स्पष्ट करून शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.
कल्याण ग्रामीणचा शिवसेनेचा अधिकृत उमेदवार कोण होऊ शकतो, हे उद्या अर्ज छाननीनंतर स्पष्ट होईल. हा निर्णय राज्यासाठी मॉडेल ठरू शकतो. त्यामुळे या मतदारसंघासह अन्य ठिकाणीही हा विषय चर्चेचा आहे.