शिवसेना सत्तेसाठी हपापलेली नाही- एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 11:07 PM2018-12-13T23:07:03+5:302018-12-13T23:07:31+5:30

विरोधी पक्षांना आपण अजूनही विरोधी पक्षात आहोत हे कळत नाही. त्यामुळे शिवसेनेला सत्ताधारी आणि विरोधीपक्ष अशा दोन्ही भूमिका पार पाडाव्या लागतात, असे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

Shiv Sena is not deprived of power- Eknath Shinde | शिवसेना सत्तेसाठी हपापलेली नाही- एकनाथ शिंदे

शिवसेना सत्तेसाठी हपापलेली नाही- एकनाथ शिंदे

Next

बदलापूर : विधानसभेत सर्वसामान्यांचे प्रश्न येतात तेव्हा मंत्रिपद बाजूला ठेवून शिवसेनेचे मंत्री, आमदार सर्वसामान्य नागरिकांच्या बाजूने उभे राहतात. शिवसेना सत्तेसाठी हपापलेली नाही. विरोधी पक्षांना आपण अजूनही विरोधी पक्षात आहोत हे कळत नाही. त्यामुळे शिवसेनेला सत्ताधारी आणि विरोधीपक्ष अशा दोन्ही भूमिका पार पाडाव्या लागतात, असे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

बदलापूर शिवसेनेच्या वतीने मांजर्ली येथील गौरी हॉलमध्ये पदाधिकारी मेळाव्यात मार्गदर्शन करताना शिंदे यांनी राज्यातील शिवसेनेची भूमिका मांडली. दिवसभर चाललेल्या मेळाव्यात शिवसेनेच्या कार्यपद्धतीची माहिती कार्यकर्त्यांना देण्यात आली. मेळाव्याच्या समारोप समारंभाला शिंदे उपस्थित होते. शिवसेनेने सर्वसामान्य नागरिकांची बांधिलकी जपल्याने २०१४ च्या विधानसभा, पालघर तसेच ठाणे जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा सर्वच निवडणुकांत यश मिळाल्याचे सांगितले. याप्रमाणेच येणारी प्रत्येक निवडणूक जिंकण्याच्या निश्चयाने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी पदाधिकारी व कार्यक र्त्यांना केले.

या वेळी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, आमदार मनीषा कायंदे, डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख वामन म्हात्रे, बदलापूरच्या नगराध्यक्ष विजया राऊत, उपनगराध्यक्ष सुनील भगत, गटनेते श्रीधर पाटील, उपजिल्हाप्रमुख एकनाथ शेलार, तालुकाप्रमुख बाळाराम कांबरी, वांगणी शहरप्रमुख प्रसाद परब आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुखांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असून त्यांच्या शब्दापुढे आम्हाला मंत्रिपद मोठे नसल्याचे शिंदे म्हणाले. शेतकऱ्यांना एक लाख रुपये असलेली कर्जमाफीची मर्यादा दीड लाखापर्यंत करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आणि सरकारला तो निर्णय घ्यावा लागला, असे ते म्हणाले.

चुकल्यास सेना धरते कान
जेव्हा केंद्र वा राज्य सरकारकडून एखादा चुकीचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांत आधी विरोध उद्धव ठाकरे यांनी केला. नोटाबंदी, जीएसटी, भूमिअधिग्रहण कायदा अशा कोणत्याही प्रश्नावर त्यांनी तडजोड केली नाही. अंगणवाडी शिक्षक, आरक्षण, सर्वसामान्य, शेतकरी कुणाचाही प्रश्न असो शिवसेना त्यांच्यासाठी काम करत राहिली आहे आणि करत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Web Title: Shiv Sena is not deprived of power- Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.