पक्षाच्या प्रवक्त्यास शिवसेनेची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:31 AM2019-09-26T00:31:20+5:302019-09-26T00:31:33+5:30
शिवसैनिक नाराज; मेहतांविरोधात भूमिका
मीरा रोड : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भाजपने विरोध केल्याने आमदार नरेंद्र मेहतांबाबत शिवसेनेत संतापाची लाट उसळून, निवडणुकीत त्यांच्यासाठी काम न करण्याचा इशारा देणारे शिवसेनेचे प्रवक्ते शैलेश पांडे यांना जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे यांनी आमदार प्रताप सरनाईकांच्या निर्देशानुसार खुलासा सादर करण्यास सांगितले आहे. बाळासाहेब व उद्धव ठाकरे यांच्यासाठी आक्रमक पवित्रा घेणाऱ्या शिवसैनिकांबद्दल गर्व आहे, असे आधी सांगणाºया सेना नेत्यांनीच आता खुलासा मागवल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे.
१७ सप्टेंबर रोजीच्या स्थायी समिती बैठकीत सत्ताधारी भाजपाने बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या निविदा मंजुरीचा विषय न घेतल्याने झालेल्या वादातून शिवसेना नगरसेवकांची भाजप नगरसेवकांसोबत धक्काबुक्की होऊन त्याचे पर्यवसान तोडफोडीत झाले होते. याप्रकरणी शिवसैनिकांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पांडे यांनी आपली भूमिका मांडणारा व्हिडीओ व्हायरल केला. सेना व भाजपप्रमुखांच्या नावे पत्रव्यवहार करून आ. मेहतांना उमेदवारी दिल्यास शिवसैनिक काम करणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर आमदार प्रताप सरनाईक यांच्या निर्देशावरून सेनेचे जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे यांनी सोमवारीच पांडे यांना या मुद्यावर लेखी खुलासा सादर करण्याचे पत्र दिले. पांडे हे नगरसेवक नसताना पालिकेत गेले आणि तेथील वादात सहभागी झाले. त्यानंतर, व्हिडीओ क्लिप व पत्राद्वारे सेनेच्या वरिष्ठांना न विचारता परस्पर आ. मेहतांचा प्रचार न करण्याची भूमिका परस्पर मांडली. युतीचा निर्णय घेण्याचे अधिकार पक्षप्रमुखांना असून, पांडे यांनी शिस्त पाळली नसल्याचे म्हात्रे यांनी पत्रात म्हटले आहे. याबाबत तीन दिवसांत खुलासा सादर करून, तोपर्यंत पक्षाच्या आदेशाशिवाय कुठलेही पत्र वा व्हिडीओ प्रसिद्ध करू नये, अशी सूचना म्हात्रे यांनी केली आहे.
पालिकेत शिवसैनिकांची कामे भाजपच्या दबावाखाली केली जात नाहीत. विकासकामांसाठी निधी दिला जात नाही. अशा परिस्थितीत पांडेंकडूनच जिल्हाप्रमुखांनी खुलासा मागवल्याबद्दल शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या निवडणुकीआधी गोडदेवनाक्यावर ग्रामस्थांसोबत झालेल्या मेहता व समर्थकांमधील वादानंतर सेनेने नगरसेविका तारा घरत यांच्याविरोधात पत्र काढले होते. त्याच्या प्रती भाजपने गावागावांत वाटल्या होत्या, हे विशेष.
पालिकेतील तोडफोड प्रकरणी भाजपच्या दबावामुळे १७ नगरसेवकांसह अन्य शिवसैनिकांवरही गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर, सेना नगरसेवकांच्या घरी पोलीस पाठवण्यात आले होते.