बदलापूरच्या लॉकडाऊनला शिव सेनेचा विरोध, मुख्याधिकाऱ्यांनी खुलासा करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 07:34 AM2021-05-09T07:34:26+5:302021-05-09T07:34:32+5:30

बदलापूर शहरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन बदलापूर पालिकेने मुरबाड पॅटर्नप्रमाणे सात दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन लागू केला. त्यामध्ये मेडिकल, बँक आणि दवाखाने वगळता इतर सर्व दुकाने आस्थापना बंद करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत.

Shiv Sena opposes Badlapur lockdown | बदलापूरच्या लॉकडाऊनला शिव सेनेचा विरोध, मुख्याधिकाऱ्यांनी खुलासा करण्याची मागणी

बदलापूरच्या लॉकडाऊनला शिव सेनेचा विरोध, मुख्याधिकाऱ्यांनी खुलासा करण्याची मागणी

Next

बदलापूर: बदलापूर शहरात शनिवारपासून आठ दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, या लॉकडाऊनला शिवसेनेने विरोध केला आहे. बदलापूर शहरातील रुग्णसंख्या कमी होत असताना आता कडक लॉकडाऊनची गरज काय, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. यासंदर्भात जाब विचारण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी पालिका कार्यालयात ठाण मांडले होते.

बदलापूर शहरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन बदलापूर पालिकेने मुरबाड पॅटर्नप्रमाणे सात दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन लागू केला. त्यामध्ये मेडिकल, बँक आणि दवाखाने वगळता इतर सर्व दुकाने आस्थापना बंद करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. मात्र, शासनाने ब्रेक द चेन मोहिमेंतर्गत सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दुकानांना परवानगी दिलेली असताना आणि या मोहिमेमुळे शहरातील रुग्णसंख्या कमी होत असताना आता पुन्हा कडकडीत लॉकडाऊन करण्याची गरज काय, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. लॉकडाऊनला शिवसेनेने विरोध केला आहे. हाच विरोध दर्शवण्यासाठी शिवसेनेचे म्हात्रे हे शनिवारी सकाळपासून बदलापूर पालिकेच्या सभागृहामध्ये ठाण मांडून बसले. मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी आमच्या समोर येऊन आम्हाला स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली. मात्र, ही घोषणा गुरुवारी केल्यापासून पुजारी बदलापूर पालिकेत फिरकलेले नाहीत. त्यामुळे जोपर्यंत पुजारी येऊन आम्हाला स्पष्टीकरण देत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, अशी भूमिका म्हात्रे यांनी घेतली आहे.

आ. किसन कथोरे यांनी साधला शिवसेनेवर निशाणा
बदलापूर शहरात कडकडीत लॉकडाऊन लावण्यात आला असून, शिवसेनेने याला विरोध केला आहे. यावरून आता मुरबाड विधानसभेचे भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. फक्त ठेकेदारी बंद झाली म्हणून लॉकडाऊनला विरोध केला जात असल्याचा आरोप कथोरे यांनी केला.

शहरात आठवडाभराच्या कडक लॉकडाऊनला सुरुवात -
राज्य सरकारने लागू केलेला लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर बदलापूर पालिकेने घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयाला जिल्हाधिकाऱ्यांनीही शुक्रवारी रात्री उशिरा मंजुरी दिली. आमदारांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मेडिकल स्टोअर, बँक आणि रुग्णालय सेवा वगळता सर्व अत्यावश्यक सेवा या आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी शनिवारपासून सुरू झाली.

एकीकडे राज्य सरकार नागरिकांना कमीत कमी त्रास होईल त्या अनुषंगाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणत नवनवीन प्रयोग करीत आहे, तर दुसरीकडे बदलापुरातून कोरोना हद्दपार करण्याच्या उद्देशाने पालिका प्रशासनाने शहरात कडक लॉकडाऊन करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू केले आहेत. शनिवारपासून पुढील सात दिवस शहरात कडक लॉकडाऊन असेल. नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

बदलापूर शहरात लॉकडाऊन लागावा यासाठी आमदार किसन कथोरे यांनी पालिका सभागृहात सर्वपक्षीय सदस्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत लॉकडाऊन संदर्भातील निर्णय घेऊन प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता. या निर्णयाला जिल्हाधिकार्‍यांनीही समर्थन दर्शवीत बदलापुरात कडक लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनसाठी कथोरे यांनी पुढाकार घेतल्याने इतर पक्षांनी मात्र आता या कडक लॉकडाऊनला विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

नागरिकांचे होतील हाल - म्हात्रे
कडक लॉकडाऊनमुळे नागरिकांचे हाल होणार असल्याचे मत शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे. हे लॉकडाऊन रद्द करावे, या मागणीसाठी म्हात्रे यांनी शनिवारी पालिका सभागृहात ठाण मांडून आपला निषेध व्यक्त केला, तर पोलिसांनी लॉकडाऊनच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.
 

Web Title: Shiv Sena opposes Badlapur lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.