वाढवण बंदराला मच्छिमारांसह शिवसेनेचाही विरोध
By admin | Published: June 29, 2015 04:20 AM2015-06-29T04:20:10+5:302015-06-29T04:20:10+5:30
वाढवण येथे केंद्र आणि राज्य शासन साकारीत असलेले प्रस्तावित बंदर रद्द न केल्यास किंवा या बंदराची जागा बदलली नाही तर बंदर रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात येईल.
ठाणे: पालघर जिल्हयातील वाढवण येथे केंद्र आणि राज्य शासन साकारीत असलेले प्रस्तावित बंदर रद्द न केल्यास किंवा या बंदराची जागा बदलली नाही तर बंदर रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष तसेच पालघरचे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अनंत तरे यांनी दिला आहे.
पालघर मच्छिमार भवन येथे संघर्षाची पुढील दिशा ठरविण्यासाठी ठाणे जिल्हा मच्छिमार संघाच्या वतीने आयोजित बैठकीत त्यांनी हा इशारा दिला. या बैठकीला पालघर, मुंबई, ठाणे, रायगडमधून मोठया संख्येने नागरिक व मच्छीमार बांधव उपस्थित होते. वाढवण येथे नविन जेएनपीटी आणि पी अॅन्ड ओ च्या नव्या बंदराचा प्रस्ताव अंमलात आणला जात आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि मच्छीमार बांधवांचा मूळ व्यवसाय धोक्यात येऊन हा समाज आणि मच्छिमार बांधव उद्ध्वस्त होतील. सध्या इतर ठिकाणी मच्छीमारांना चांगली मासेमारी करता येत नाही. परंतु, याठिकाणी मच्छीचा चांगला झोन असल्याने तो नाहीसा होईल. तसेच तारापूर अनुसूचित केंद्र आणि पाकिस्तानची सीमा जवळ असल्यामुळे या बंदरालाही धोका निर्माण होऊ शकतो, असेही ते म्हणाले. १९८८ च्या सुमारास युती शासनाच्या काळात वाढवण येथे अशा प्रकारे बंदर करण्याचा प्रयत्न झाला. परंतु, परिसरातील सर्व स्थानिक आणि मोठया प्रमाणात मच्छिमारांनी केलेल्या विरोधानंतर खुद्द वाढवण येथे जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थानिकांचे तसेच कोळी बांधवांचे म्हणणे ऐकून वाढवण बंदर प्रकल्प रद्द करण्याच्या विनंतीनुसार तातडीने निर्णय घेतला. आता पुन्हा एकदा युती शासन सत्तेवर असल्यामुळे आपल्या मागणीचा सकारात्मक विचार होईल, असा विश्वास तरे यांनी बैठकीत व्यक्त केला. (प्रतिनिधी)