शिवसेनेकडून कर्नाटक सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:38 AM2020-08-10T00:38:44+5:302020-08-10T00:38:56+5:30
कल्याण-डोंबिवलीत आंदोलन; घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला
कल्याण : बेळगाव जिल्ह्यातील निपाणी गावाजवळ असलेल्या मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला. याबाबत मराठी भाषिकांकडून संताप व्यक्त होत असताना कल्याण-डोंबिवली शहरांत शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटक भाजप सरकारविरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
कल्याणमधील शिवाजी चौकात हे आंदोलन झाले. कर्नाटकमधील भाजप सरकार मराठीद्वेष्टे आहे. भाजपने छत्रपतींच्या नावाखाली मते मागितली आणि आता असे कृत्य करतात. तत्काळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवण्यात यावा, अन्यथा वेळप्रसंगी आम्हाला पक्षाकडून आदेश आल्यास तिथे जाऊन आंदोलन करू, असा इशारा शिवसैनिकांच्या वतीने देण्यात आला. शिवसेना कल्याण शाखेतर्फे छेडलेल्या आंदोलनात माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक राजेंद्र देवळेकर, केडीएमसी सभागृहनेते प्रकाश पेणकर, परिवहन माजी सभापती रवींद्र कपोते, नगरसेवक महेश गायकवाड, विद्याधर भोईर, विजया पोटे, सचिन बासरे यांसह अन्य आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. डोंबिवलीतही शिवसेनेचे शहराध्यक्ष राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी जोडेमारो आंदोलन केले. पूर्वेतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन केले. दरम्यान, शिवसेनेने मीरा-भार्इंदरमध्येही निषेध करताना कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पांच्या प्रतिमेस चपलांनी चोप दिला.
कर्नाटक सरकारविरोधात घोषणा
उल्हासनगर : कर्नाटक येथील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यात आल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने शिवाजी चौकात मुख्यमंत्री यडुरप्पा यांच्या पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करून पुतळा जाळण्यात आला. यावेळी कर्नाटक सरकारविरोधात घोषणाबाजी करून शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला.
शिवाजी चौकात शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी दुपारी २ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचा बेळगावमधील मनगुत्ती गावात बसविलेला पुतळा कर्नाटक सरकारने हटविल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले. कर्नाटकमधील भाजप सरकार महाराष्ट्र व मराठीद्वेष्टे आहे, असा आरोप चौधरी यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा त्याजागी बसवा, अन्यथा कर्नाटकात जाऊन आंदोलन करू, असा इशारा दिला.