बरोरा यांना उमेदवारी देण्यास शिवसैनिकांनी केला विरोध; निष्ठावंत नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 11:36 PM2019-09-11T23:36:45+5:302019-09-11T23:37:04+5:30
जर तुम्ही ‘मातोश्री’चा आदेश पाळता, तर उद्या तेथूनच बरोरा यांचे नाव जाहीर झाल्यास काम करणार का, असा प्रश्न विचारला असता, ‘मातोश्री’चा हा निर्णय नसून पक्षश्रेष्ठी आमच्यापैकीच एकाचे नाव जाहीर करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
भातसानगर : आयारामांना तिकीट न देता पक्षश्रेष्ठींनी निष्ठावंतांना उमेदवारी द्यावी. पांडुरंग बरोरा यांना तिकीट दिल्यास आम्ही अजिबात काम करणार नाही, असा निर्धार नाराज शिवसैनिकांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच वातावरण तापले आहे.
माजी आमदार दौलत दरोडा, तालुका संघटक चंद्रकांत जाधव, ज्ञानेश्वर तळपाडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजूषा जाधव, राजेंद्र म्हसकर, अविनाश शिंगे यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली. आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्यावी, आम्ही निष्ठेने काम करू, असे यावेळी त्यांनी सांगितले.
जर तुम्ही ‘मातोश्री’चा आदेश पाळता, तर उद्या तेथूनच बरोरा यांचे नाव जाहीर झाल्यास काम करणार का, असा प्रश्न विचारला असता, ‘मातोश्री’चा हा निर्णय नसून पक्षश्रेष्ठी आमच्यापैकीच एकाचे नाव जाहीर करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केवळ, नाकर्ते तालुकाप्रमुख मिळाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे स्पष्ट करून चंद्रकांत जाधव यांनी तालुकाप्रमुख मारुती धिर्डे यांच्यावर शरसंधान साधले.
महिनाभरापूर्वीच झालेल्या एका बैठकीत घेण्यात आलेल्या ठरावात बरोरा यांना पक्षात घेऊ नका, असे ठरलेले असताना केवळ धिर्डे हेच त्यांना घेऊन फिरत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. ज्यांनी १९८० पासून आम्हा शिवसैनिकांवर अन्याय केला, मारहाण केली, हे शिवसैनिक आजही विसरले नसल्याची पुष्टी यावेळी जोडण्यात आली. त्यामुळे हेच उद्या शिवसेनेची राष्ट्रवादी करतील, अशी शक्यता या नाराज गटाने वर्तवली. जो कुणी पक्षाच्या विरोधी भूमिका स्पष्ट करेल, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे काही दिवसांपूर्वी धिर्डे यांनी स्पष्ट केले होते. आता या पाच जणांवर काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.
आमिषाला बळी पडणार नाही
विधानसभेसाठी उमेदवारीऐवजी एखादे महामंडळ किंवा विधान परिषदेचे तिकीट देण्याचे आमिष दाखवले, तरी मी त्याला बळी पडणार नाही, अशी स्पष्ट भूमिका माजी आमदार दौलत दरोडा यांनी घेतली आहे.