उपराष्ट्रपतींच्या ‘त्या’ वक्तव्याचा शिवसेनेकडून जिल्हाभरात निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 11:56 PM2020-07-23T23:56:34+5:302020-07-23T23:57:40+5:30
खासदारांसह सैनिकांच्या घोषणा
पालघर : राज्यसभेत निवडून आलेले नेते निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावांचा वापर करतात आणि दुसरीकडे त्याच छत्रपतींच्या नावाला राज्यसभेचे सभापती, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू माझ्या सदनात अन्य व्यक्तीचे नाव घेऊ नये असे बोलून विरोध करतात. त्यामुळे या कृतीचा पालघर जिल्हा शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
संसदेत बुधवारी नवनिर्वाचित राज्यसभेच्या सदस्यांचा शपथविधी पार पडत असताना साताºयाचे उदयनराजे भोसले हे नवनिर्वाचित सदस्य पद, गोपनीयतेची शपथ घेत असताना त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष केला. या वेळी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी छत्रपतींचा जयघोष करण्यास विरोध करताना माझ्या सदनात अन्य कुणाचाही जयघोष करू नये असे वक्तव्य केले. भारताच्या गौरवशाली ऐतिहासिक परंपरेचा हा अवमान असून त्यामुळे भारतीयांच्या व राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.
उपराष्ट्रपतींच्या वक्तव्याचा गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले खासदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी, जिल्हाप्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण, महिला जिल्हाप्रमुख ज्योती मेहेर, जि.प. सदस्य वैदेही वाढाण, पं.स. सभापती भारती कोल्हेकर, जिल्हा उपप्रमुख राजेश कुटे, तालुका प्रमुख विकास मोरे, युवा जिल्हाप्रमुख जश्विन घरत, न.प. सभापती अनुजा तरे, नीलम संखे, भूषण संखे, भुवनेश्वर मेहेर, संजय तामोरे आदींनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून माफी मागण्याची मागणी केली.