मीरा-भार्इंदरमध्ये अल्पसंख्याक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला रामराम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 01:42 AM2019-05-07T01:42:49+5:302019-05-07T01:43:07+5:30
शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या बुरखा बंदीच्या भूमिकेमुळे मीरा भार्इंदरमध्ये शिवसेनेच्या अल्पसंख्याक आघाडीच्या प्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे देऊन सेनेला रामराम ठोकला आहे.
मीरा रोड : शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या बुरखा बंदीच्या भूमिकेमुळे मीरा भार्इंदरमध्ये शिवसेनेच्या अल्पसंख्याक आघाडीच्या प्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे देऊन सेनेला रामराम ठोकला आहे. भाजपसोबत जाणार नाही, असं सांगणाºया शिवसेनेत मोठ्या विश्वासाने आम्ही सामील झालो; पण भाजपसोबत केलेली युती, सामाजिक सलोख्याऐवजी द्वेषकारक भूमिका आणि विकासाच्या मुद्यावर भ्रमनिरास झाल्याचे या पदाधिकाºयांनी सांगितले.
राष्ट्रीय अमन मंचसह मुस्लिम समाजातील अनेकांनी २०१७ साली शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांनी मुस्लिम समाजाला जोडण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु नजीकच्या काळात आलेले अनुभव आणि सेना नेते संजय राऊत यांनी बुरखा बंदीची केलेली मागणी यामुळे रविवारी सायंकाळी सेनेच्या अल्पसंख्याक आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सेनेला सोडचिठ्ठी दिली.
मीरारोडच्या नया नगरमधील अस्मिता समीर इमारतीतील शिवसेनेच्या कार्यालयाचे फलक काढून घेण्यात आले. अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाप्रमुख कमल मिनाई, पदाधिकारी तथा पालिका निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार असलेले महेजबीन शेख, इस्लाम शेख, मेहमुदा नागोरी यांच्यासह जिल्हा संघटक अब्दुल रहिम शेख आदि शिवसैनिकांनी पक्षाचा राजिनामा दिल्याचे जाहीर केले .
शहराचा विकास करण्यासह सत्तेत चालवलेला भ्रष्टाचार आणि दडपशाही रोखण्याची भूमिका सेनेने मांडली होती. राजकीय फायद्यासाठी शहरातील धार्मिक सलोखा बिघडवण्याचे भाजप नेत्यांचे सुरू असलेले प्रयत्न मोडून काढण्यासाठी सेनेने पुढाकार घेतला होता. या विचारांनी प्रभावित होऊन आपण सेनेत आलो होतो, असे मिनाई म्हणाले.
बाळासाहेब जे बोलायचे त्या भूमिकेवर ठाम असायचे. पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकारवर जहरी टीका करत युती करणार नाही, असे अनेकदा सांगितले; पण तो शब्द फिरवत त्यांनी युती केली. मोदी सरकारच्या काळात अल्पसंख्याकांना डावलण्यासह अन्याय केला जात आहे. सेनेने भाजपशी युती केल्यावर स्थानिक पातळीवर अल्पसंख्याक म्हणून आम्हाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न, तसेच दृष्टिकोन बदलला. मॉक्सस मॉलमधील दोन्ही पक्षांच्या मेळाव्यात विकासाऐवजी धार्मिक मुद्दा पुढे केल्याने आम्ही बाहेर पडल्याचे मिनाई यांनी सांगितले.
‘बुरखा हा आमचा अधिकार; तो कोणीच काढून घेऊ शकत नाही’
शिवसेना आमच्यासाठी काहीतरी करेल, आम्हाला सोबत घेऊन जाईल अशी आशा होती. निवडणुकीत मुस्लिमांना भाई म्हणतात; पण नंतर हिंदुत्वाचीच गोष्ट ते करत राहिले. आम्ही सोबत आहोत याचेसुद्धा त्यांना भान नव्हते. म्हणून सर्वांनी राजीनामे दिले.
- मेहजबीन शेख
भाजपने तलाकचा मुद्दा बनवला, तर शिवसेनेने बुरख्याचा. बुरखा हा आम्हा महिलांना धर्माने दिलेला आत्मसम्मान आहे. तो काढून घेण्याचा कोणाला अधिकार नाही. सेनेकडून अशी अपेक्षा नव्हती.
- मेहमुदा नागोरी
बुरखा बंदीचे वक्तव्य हे संजय राऊत यांचे व्यक्तिगत होते. स्वत: उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मुस्लिम धर्माविरुद्ध नसल्याचे स्पष्ट केल्याने त्या वादावर पडदा पडला आहे. पण काहींचा गैरसमज कायम असून, तो दूर करण्याचा प्रयत्न करू. शहरात सर्वच धर्मीय अनेक वर्षे मिळूनमिसळून राहत आहेत. सेनेकडे वळत असलेल्या मुस्लिम धर्मीयांमुळ बदनाम करण्यासाठी हा खटाटोप चालवला आहे.
- प्रताप सरनाईक, आमदार, शिवसेना