उल्हासनगरात पुन्हा भाजपला चितपट करण्यास शिवसेना सज्ज?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 11:54 PM2021-03-01T23:54:51+5:302021-03-01T23:54:57+5:30
महापालिका विशेष समिती सभापतिपदासाठी चढाओढ : बहुमत असूनही ओमी कलानी यांच्या मदतीने देणार धक्का
सदानंद नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असतानाही शिवसेनेने महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती व प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपला धोबीपछाड दिल्यानंतर आता विशेष समिती सभापतिपदाची निवडणूक ९ मार्चला होणार असून, शिवसेना पुन्हा भाजपला चितपट करण्याकरिता सिद्ध झाली आहे.
उल्हासनगर महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असताना भाजपतील बंडखोर ओमी टीम समर्थक नगरसेवकांच्या मदतीने शिवसेना आघाडीने महापौर, उपमहापौर पदासह स्थायी समिती सभापती व विशेष समिती सभापतीपद भाजपकडून हिसकावून घेतले. महापालिका सार्वत्रिक निवडणूक एका वर्षावर येऊन ठेपली असून, त्यापूर्वी भाजपला विशेष समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत धक्का देण्याची रणनीती राज्यातील सत्ताधारी आघाडीतील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, उपशहरप्रमुख अरुण अशान, राष्ट्रवादीचे गटनेता व सभागृहनेते भारत गंगोत्री आखत आहेत. एकूण नऊ विशेष समिती सभापती पदासाठी ४ मार्च रोजी अर्ज भरण्याची तारीख असून, ९ मार्च रोजी सभापतिपदाची निवडणूक होणार आहे.
महापालिकेच्या सत्ताधारी आघाडीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाइं आठवले गट आदी पक्ष सहभागी आहेत.
विशेष समितीच्या एकूण नऊ सदस्यांपैकी भाजपचे पाच, शिवसेना, रिपाइं व राष्ट्रवादी पक्षाचे चार सदस्य आहेत. विशेष समितीमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत असले, तरी सर्वच सभापती पदे हिसकावून आणण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते रणनीती आखत आहेत.
nभाजपच्या शहराध्यक्षपदी जमनुदास पुरस्वानी यांची निवड झाली. तेव्हापासून भाजपला पराभवाचे धक्के बसत असून, विशेष समिती सभापतिपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
nशिवसेना, ओमी कलानी टीमचे बंडखोर नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, पीआरपी आदी पक्षांकडे विशेष समितीची सभापतिपदे जाण्याची शक्यता असून, त्यांच्यामध्ये सभापतिपदांकरिता चढाओढ आहे.