बाळ्यामामांना बंडखोरी भोवली, शिवसेनेने घेतला पदाचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 12:33 AM2019-05-29T00:33:43+5:302019-05-29T00:33:54+5:30
कपिल पाटील यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराप्रसंगी सहकार्य न केल्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समिती सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांंच्यावर सेनेने कडक कारवाई केली.
- सुरेश लोखंडे
ठाणे : भाजप - शिवसेना युतीचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराप्रसंगी सहकार्य न केल्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समिती सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांंच्यावर सेनेने कडक कारवाई केली. त्यांच्या संपर्कप्रमुखपदासह ठाणे जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाचादेखील तडकाफडकी राजीनामा घेण्यात आला. सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेप्रसंगी त्यांनी हा राजीनामा दिला. त्यांच्यासोबत महिला बालकल्याण समितीच्या दर्शना ठाकूर यांनीदेखील सभापतीपदाचा राजीनामा दिला आहे.
जिल्हा परिषदेत सभापती असूनही शिवसेनेचे म्हात्रे यांनी युतीचे उमेदवार पाटील यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत प्रचार केला. एवढेच नव्हे तर या निवडणुकीची उमेदवारी मिळवण्यासाठी युतीचा प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षाच्या तिकिटासाठीदेखील सर्वतोपरी प्रयत्न केले. यावेळी त्यांनी पक्ष आदेश (व्हीप) विचारात न घेता युतीचे उमेदवार पाटील यांच्या विरोधात भिवंडी लोकसभा मतदारसंघात रान उठवले. त्यांची गंभीर दखल घेऊन शिवसेनेने निवडणूक काळातच त्यांच्याकडील संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी काढून घेतली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच त्यांच्याकडील जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापतीपदाचा राजीनामा देण्याचे पक्षाचे आदेश त्यांना मिळाले.
जिल्हा परिषद सभापतीपदाच्या सर्व प्रकारच्या बैठकानाही त्यांना उपस्थित राहण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यामुळेच स्थायी समितीच्या दोन बैठकादेखील झालेल्या नाहीत, असे एका वरिष्ठ नेत्याकडून सांगण्यात आले. त्यांचा केवळ सभापतीपदाचा राजीनामा घेतलेला असून जिल्हा परिषदेचे सदस्य राहणार असल्याचेही निदर्शनात आणून देण्यात आले आहे. पक्ष आदेशाचे पालन करून म्हात्रे यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव यांच्याकडे सभापतीपदाचा राजीनामा दिला. तर ठरल्याप्रमाणे सव्वा वर्षाचा कार्यकाल संपल्याचे कारण पुढे करून महिला व बालकल्याण समितीच्या दर्शना ठाकरे यांनीदेखील त्यांच्या सभापतीपदाचा राजीनामा अध्यक्षांकडे सुपूर्द केला. त्यांनी हे दोन्ही राजीनामे मंजूर करून मुख्यकार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.
>राष्ट्रवादी सत्तेतून होणार हद्दपार
आता लवकरच ठाणे जिल्हा परिषदेतील शिवसेना-राष्टÑवादी काँगेस पक्षाची सत्ता बदल होण्याचे वारे वाहत असल्यामुळे या संपूर्ण बॉडीलाच सत्तेवरून पायउतार करण्याच्या राजकीय वर्तुळात हालचाली सुरू झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हा परिषदेतील सत्तेचे खांदेपालट होणार आहे. शिवसेना जिल्हा परिषदेच्या सत्तेत भाजपला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, या सत्ता बदलात राष्टÑवादीचे सुभाष पवार यांचे उपाध्यक्षपद अडीच वर्षांपर्यंत कायम ठेवणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.
>उज्ज्वला गुळवी, निखिल बरोरा यांचीही होणार गच्छंती
पक्षश्रेष्ठींनी ठरवून दिल्याप्रमाणे सव्वा वर्षाचा कार्यकाल संपल्यामुळे आता अन्यही सभापतींना पदांचा राजीनामा द्यावा लागणार आहे. यामुळे राष्टÑवादीच्या उज्ज्वला गुळवी यांनाही कृषी व पशूसंवर्धन समिती सभापतींचा व समाजकल्याण समती सभापती निखिल बरोरा यांनादेखील सभापतीपदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याचे राष्टÑवादीचे ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी स्पष्ट केले.