स्थायी समिती सभापतीपदावरून शिवसेना-रिपाइं युतीमध्ये फूट, उपमहापौर भालेराव भाजप गोटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 12:11 AM2021-04-11T00:11:49+5:302021-04-11T00:12:09+5:30
Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असताना दीड वर्षांपूर्वी शिवसेना महाआघाडीने भाजपतील ओमी समर्थक काही नगरसेवकांना फोडून महापौर व उपमहापौर निवडून आणले.
उल्हासनगर : स्थायी समिती सभापतीपदाच्या वादातून शिवसेना-रिपाइं युतीत फूट पडली आहे. उपमहापौर भगवान भालेराव भाजप गोटात सहभागी झाले असून स्वतः त्यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. १५ एप्रिल रोजी होणारी सभापतीपदाची निवडणूक पुढे ढकलली आहे. आघाडीने भालेराव यांना पद देण्यास नकार दिल्याने रिपाइं बाहेर पडल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगर महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असताना दीड वर्षांपूर्वी शिवसेना महाआघाडीने भाजपतील ओमी समर्थक काही नगरसेवकांना फोडून महापौर व उपमहापौर निवडून आणले. महापौरपदी शिवसेनेच्या लीलाबाई अशान तर उपमहापौरपदी रिपाइंचे भगवान भालेराव निवडून आले. त्यानंतरच्या स्थायी समिती सभापती, विशेष व प्रभाग समिती सभापती ही पदे शिवसेना आघाडीकडे आली. दरम्यान, महापालिका स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी भाजप समर्थक मात्र साई पक्षाचे समिती सदस्य गजानन शेळके यांना शिवसेना आघाडीने आपल्याकडे घेतल्याने, स्थायी समितीत शिवसेना आघाडी व भाजपचे प्रत्येकी आठ अशी समसमान सदस्य झाले. शिवसेना आघाडीकडून रिपाइंचे गटनेते व उपमहापौर भालेराव सभापती पदासाठी इच्छुक होते.
सभापतीपदाची निवडणूक १५ एप्रिल रोजी तर अर्ज दाखल करण्याची १२ एप्रिल तारीख होती. समिती सदस्यांची फाटाफूट होऊ नये, म्हणून शिवसेना आघाडीने ठाणे जिल्ह्यातील एका फार्म हाऊसमध्ये शिवसेना आघाडीच्या समिती सदस्यांना ठेवले. तर भाजपने पक्षाच्या समिती सदस्यांना गोवा दर्शनासाठी नेले.
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढल्याने नगरविकास विभागाने स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक पुढे ढकलली आहे. सभापतीपदासाठी इच्छुक भालेराव यांना शिवसेना आघाडीने पद देण्यास नकार दिल्याचे समजते. यातून भालेराव भाजपच्या गोटात गेल्याचे बोलले जात आहे.
भालेराव यांनी भाजपचे नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेऊन स्थानिक राजकीय परिस्थिती समजून सांगितली. भाजपचे आमदार कुमार आयलानी यांनी फडणवीस व भालेराव यांच्या भेटीला दुजोरा दिला.
शिवसेना विकास आघाडी कायम
शहरातील शिवसेना महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेसह काँग्रेस, रिपाइं, पीआरपी, राष्ट्रवादी पक्षाचा समावेश आहे. त्यापैकी रिपाइंचे भगवान भालेराव हे भाजप गोटात सहभागी झाल्याचे समजले. त्यांच्याकडे उपमहापौरपद असताना स्थायी समिती सभापतीपद मागणे उचित नाही. त्यापेक्षा शिवसेना आघाडीला सभापतीपद नको, अशी पक्षाची भूमिका असून शिवसेना आघाडी कायम आहे, असा दावा शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला आहे.