गणेश नाईकांमुळे शिवसेनेला ठाणे जिल्ह्यात वाढता धोका; नवी मुंबईतील दोन्ही मतदारसंघ सोडण्यास विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 02:17 AM2019-09-10T02:17:45+5:302019-09-10T06:35:28+5:30
रविवारी वाशीमधील मध्यवर्ती कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला. दोन्ही मतदारसंघ भाजपला दिल्यास शिवसेना नगरसेवकांनी राजीनामा देण्याचे व विरोधात काम करण्याचे मत व्यक्त केले
नवी मुंबई : माजी मंत्री गणेश नाईक यांना भाजपत प्रवेश देऊन त्यांच्यावर ठाणे जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. भविष्यात शिवसेनेला जिल्ह्यात धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे आताच योग्य पावले उचलण्यात यावीत व नवी मुंबईमधील दोनही मतदारसंघ नाईकांना सोडू नये, असे मत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केले आहे.
ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचा ११ सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार आहे. ऐरोलीमध्ये संदीप नाईक व बेलापूरमध्ये गणेश नाईक यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शिवसेना पदाधिकाºयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
रविवारी वाशीमधील मध्यवर्ती कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला. दोन्ही मतदारसंघ भाजपला दिल्यास शिवसेना नगरसेवकांनी राजीनामा देण्याचे व विरोधात काम करण्याचे मत व्यक्त केले. सोमवारी ४० पेक्षा जास्त महत्त्वाच्या पदाधिकाºयांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. माजी मंत्री गणेश नाईक यांना भाजपत प्रवेश देऊन त्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी दिली जाणार आहे. यामुळे भविष्यात शिवसेनेची डोकेदुखी वाढणार आहे. नवी मुंबईमधील दोनही मतदारसंघामध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद चांगली आहे. यामुळे कोणत्याही स्थितीमध्ये येथील मतदारसंघ भाजपला दिले जाऊ नयेत. बेलापूर मतदारसंघ गणेश नाईकांना सोडू नये असा आग्रह या बैठकीमध्ये धरण्यात आला.
शिवसेना पदाधिकाºयांनी तीव्र भावना पालकमंत्र्यांजवळ व्यक्त केल्या. भाजपला दोन्ही मतदारसंघ सोडल्यास नवी मुंबईमध्ये शिवसेना कमकुवत होईलच, शिवाय ठाणे जिल्ह्यातही त्याचे गंभीर परिणाम होतील हेही निदर्शनास आणून दिले. एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाºयांच्या भावना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवून पक्षहिताचाच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे. या बैठकीला बेलापूरचे जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, ऐरोलीचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, नगरसेवक शहर प्रमुख विजय माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबईमधील ऐरोली व बेलापूर मतदारसंघ शिवसेनेला मिळावे अशी पदाधिकाºयांची तीव्र भावना आहे. दोन्ही मतदारसंघ भाजपला सोडले जाऊ नये, अशी भूमिका पदाधिकाºयांनी व्यक्त केली आहे. या भावना पक्षनेतृत्वापर्यंत पोहोचविण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली व त्यांना पदाधिकाºयांच्या भावना कळविल्या. - विठ्ठल मोरे, शिवसेना जिल्हा प्रमुख, बेलापूर