शिवसेना-रिपाइंची युती
By admin | Published: February 1, 2017 03:19 AM2017-02-01T03:19:00+5:302017-02-01T03:19:00+5:30
गेल्या आठवडयात स्थापन झालेल्या भाजपा, कलानी (युडीए)तून बाहेर पडून रिपाइंने शिवसेनेबरोबर युती केली. शिवसेना व रिपाइं नेत्यांनी पत्रकार परिषदेत याबाबत
उल्हासनगर : गेल्या आठवडयात स्थापन झालेल्या भाजपा, कलानी (युडीए)तून बाहेर पडून रिपाइंने शिवसेनेबरोबर युती केली. शिवसेना व रिपाइं नेत्यांनी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. शिवसेनेने रिपाइंला १३ जागा सोडल्या आहेत.
यावेळी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, खासदार श्रीकांत शिंदे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, आमदार बालाजी किणीकर, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव, बी बी मोरे यांनी युतीची घोषणा केली.
उल्हासनगरात भाजपा, ओमी कलानी व रिपाइं यांच्या ‘शहर विकास आघाडी’ची स्थापना दोन दिवसांपूर्वी गोल मैदानात झाली. मात्र रिपाइंला सोडण्यात आलेल्या जागेवर कलानी यांनी आपल्या टीमच्या सदस्यांकरिता हक्क सांगण्यात सुरुवात केल्याने ‘युडीए’त वादाची ठिणगी पडली. रिपाइंच्या संतप्त कार्यकर्त्यांनी लागलीच शिवशक्ती- भीमशक्तीची हाक दिली. सोमवार रात्री उशिरा शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी व रिपाइंचे भगवान भालेराव यांनी एकत्र बसून जागावाटप नक्की केले व मंगळवारी युती घोषित केली.
रिपाइंला १३ जागा सोडल्याचे लांडगे यांनी सांगितले. मात्र या जागा कोणत्या प्रभागातील आहेत. याचे उत्तर गुलदस्त्यात ठेवण्यात आल्याने
रिपाइंत सभं्रम कायम आहे. भाजपा-ओमी कलानी यांच्याप्रमाणे शिवसेनाही खेळ खेळते की काय, अशी शंका रिपाइं कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
रिपाइंला गेल्या काही दिवसांत गळती लागल्याने पक्ष दुबळा बनला आहे. पक्षाच्या गटनेत्या पुष्पा बागुल तसेच माजी शहर जिल्हाध्यक्ष नाना बागुल यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत तर पक्षाच्या नगरसेविका आशा बिऱ्हाळे यांनी ओमी टीममध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे एखाद्या मातब्बर पक्षासोबत युती करणे ही रिपाइंची गरज झाली असल्याचे बोलले जात आहे.