शिवसेना, साई पक्षाचा भाजपाला इशारा
By admin | Published: January 10, 2017 06:33 AM2017-01-10T06:33:33+5:302017-01-10T06:33:33+5:30
जोवर ओमी कलानी आणि त्यांच्या टीमच्या भाजपामधील प्रवेशाचा प्रश्न सुटत नाही, त्याचा निकाल लागत नाही तोवर महायुतीबाबत भाजपाशी चर्चा करणार नाही
उल्हासनगर : जोवर ओमी कलानी आणि त्यांच्या टीमच्या भाजपामधील प्रवेशाचा प्रश्न सुटत नाही, त्याचा निकाल लागत नाही तोवर महायुतीबाबत भाजपाशी चर्चा करणार नाही, असा इशारा शिवसेना आणि साई पक्षाने दिला आहे. हा राजकीय तिढा सुटल्यावरच महायुतीच्या वाटाघाटी होतील, असे त्यांनी स्पष्ट केल्याने भाजपाची कोडी झाली आहे.
उल्हासनगर महापालिकेवर भाजपाचा महापौर बसविण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतल्यानंतर पक्षातील नेत्यांनी वेगवेगळ््या गटांशी चर्चा सुरू केली. मात्र ओमी कलानी यांना विरोध आणि पाठिंब्यासाठी पक्षातील दोन्ही गट तुल्यबळ ठरल्याने भाजपा नेमकी कोणासोबत जाणार याबाबत मित्र पक्षांत संभ्रम होता.
कलानी समर्थकांची कोंडी करण्यासाठी कुमार आयलानी यांनी शिवसेना, रिपाइं आणि स्थानिक पक्ष साई पक्षासोबत युतीबाबत बोलणी व चर्चा सुरू केली. त्यातून गोंधळ निर्माण झाल्याने अखेर वरिष्ठांनी आयलानी यांची कानउघाडणी केली. त्यामुळे त्यांना महायुतीची बोलणी बंद करावी लागली.
गेली दहा वर्षे पालिकेतील सत्तेची चावी स्वत:कडे ठेवणाऱ्या साई पक्षाने सावध भूमिका घेतली आणि भाजपा-ओमी कलानी टीमचा तिढा सुटत नाही, तोवर युतीबाबत चर्चा नाही, अशी भूमिका पक्षाचे सर्वेसर्वा जीवन इदनानी यांनी घेतली. शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनीही वरिष्ठांच्या आदेशानंतरच भाजपासोबत बोलणी करणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)