उल्हासनगरात शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाची हत्या, हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Published: May 27, 2023 12:32 PM2023-05-27T12:32:35+5:302023-05-27T12:32:52+5:30
गुन्हे अन्वेषण विभाग व पोलीस पथक आरोपीचा शोध घेत आहेत.
उल्हासनगर : कॅम्प नं-५, जयजनता कॉलनीत राहणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचा शाखाप्रमुख शब्बीर शेख याची शुक्रवारी रात्री जुन्या भांडणातून ७ ते ८ जणांच्या टोळक्याने हत्या केली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. गुन्हे अन्वेषण विभाग व पोलीस पथक आरोपीचा शोध घेत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील जयजनता कॉलनी परिसरात राहणारा शिवसेना शिंदे गटाचे शाखाप्रमुख शब्बीर शेख याचे मटका जुगार धंद्यातून एका टोळक्या सोबत भांडण झाले होते. यातूनच शुक्रवारी रात्री घरा समोर उभा असलेला शेख याच्यावर ७ ते ८ जणांच्या टोळीने धारधार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात शबीर याचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती हिललाईन पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन, पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेतला. मध्यवर्ती रुग्णालयात मृतदेह उत्तर तपासणीसाठी पाठविला असून आरोपीच्या शोधार्थ शहर गुन्हे अन्वेषण विभाग व हिललाईन पोलिसांचे पथक रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मयत शब्बीर शेख यांचे वडील कट्टर शिवसैनिक असून ते उपशहरप्रमुख राहिले आहेत. अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. तो कोणता व्यवसाय करीत होता. याबाबत आपल्याला माहीत नसल्याचे यावेळी चौधरी म्हणाले. जयजनता कॉलनी परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार शब्बीर हा मटक्याचा धंदा चालविणारा असून त्याचे काही दिवसांपूर्वी एका टोळक्या सोबत तू तू मैं मैं झाली होती. यातूनच शब्बीर याचा खून झाला असावा. असा अंदाज पोलीस व्यक्त करीत आहेत.
गेल्या महिन्यात याच जयजनता कॉलनीतील मटका जुगाराच्या खोलीची शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख कैलास तेजी, महिला समन्वयक जया तेजी यांच्यासह पदाधिकार्यांनी तोडफोड केली होती. मात्र मटका धंदा यापूर्वीच बंद होता. असा ठपका ठेवून हिललाईन पोलिसांनी कैलास तेजी यांच्यासह अन्य पदाधिकार्यावर तोडफोड करून नुकसान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
मटका जुगार अड्ड्याचे शहर?
शहरातील अवैध धंदे, मटकी जुगार, ऑनलाईन लॉटरी जुगार, गावठी दारूचे अड्डे, गुन्हेगारीत वाढ आदींचा प्रश्न स्थानिक आमदारांनी विधानसभेत उठवून शासनाकडे कारवाईची मागणी केली होती. मात्र या धंद्यात राजकीय वरदहस्त मिळालेले पदाधिकारी असल्याने, अवैध धंद्यावर दिखाऊ पोलीस कारवाई होत असल्याचा आरोप होत आहे.