उल्हासनगर व अंबरनाथची शिवसेना कार्यकारणी बरखास्त, १८ व १९ जुलैला होणार मुलाखती
By सदानंद नाईक | Published: July 16, 2024 05:07 PM2024-07-16T17:07:32+5:302024-07-16T17:08:08+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी उल्हासनगर व अंबरनाथ शिवसेना व महिला आघाडीची कार्यकारिणी अचानक बरखास्त केल्याने खळबळ उडाली.
उल्हासनगर :शिवसेना शिंदे गटाची उल्हासनगर व अंबरनाथ शहर कार्यकारणी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी बरखास्त केली. १८ व १९ जुलै रोजी दोन्ही शहरांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार असून त्यानंतर शहरप्रमुखासह शहर कार्यकारिणीची घोषित करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी उल्हासनगर व अंबरनाथ शिवसेना व महिला आघाडीची कार्यकारिणी अचानक बरखास्त केल्याने खळबळ उडाली. लोकसभा निवडणूकीत खासदार श्रीकांत शिंदे यांनी विजयाची हॅटट्रिक साधली. मात्र समोर नवखा उमेदवार असतांनाही मताधिक्य घटल्याने शिवसेने अंतर्गत कार्यकारणीत बदलीचे वारे वाहू लागले. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत भाजपा, राष्ट्रवादी, रिपाइंचे आठवले, कवाडे गट, स्थानिक साई पक्ष, तसेच कलानी कुटुंब हे शिंदे यांच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरले होते. मात्र मोठे मताधिक्य मिळाले नसल्याने, शिवसेना वरिष्ठ नेत्या मध्ये नाराजीचे सूर होते. अखेर मुख्य कार्यकारिणीतील महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर-महाराज, रमेश चव्हाण यांच्यासह सर्व उपशहरप्रमुख, संघटक, विभागप्रमुख या सर्वांची पदे बरखास्त करण्यात आल्याचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी जाहीर केले. मात्र यातून युवासेनेला वगळण्यात आले आहे.
उल्हासनगर व अंबरनाथ शिवसेना कार्यकारणी बरखास्त बरखास्त करण्यात आल्यावर १८ जुलै रोजी अंबरनाथ मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती तर १९ जुलै रोजी शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कॅम्प नं-३,सी ब्लॉक येथील गुरुद्वार मध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख लांडगे यांनी दिली. यासंदर्भात महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी पक्षाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असल्याचे सांगून आम्ही शिंदे यांच्या सोबत असल्याचे सांगितले.