१० पैकी ६ प्रभाग समित्यांवर शिवसेना
By Admin | Published: February 28, 2017 03:15 AM2017-02-28T03:15:01+5:302017-02-28T03:33:02+5:30
ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महापालिकेत प्रथमच स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
ठाणे/घोडबंदर : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महापालिकेत प्रथमच स्पष्ट बहुमत मिळाले आहे. असे असले तरी १० प्रभाग समित्यांपैकी सहा प्रभाग समित्या शिवसेनेच्या वाट्याला येणार असून दोन प्रभाग समित्या भाजपा आणि दोन राष्ट्रवादीच्या वाट्याला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसचे अस्तित्वच संपुष्टात आल्याने त्यांच्या हाती मात्र धोपाटणेच येणार आहे.
माजिवडा-मानपाडा, वर्तकनगर, लोकमान्यनगर सावरकरनगर, रायलादेवी, दिवा आणि वागळे इस्टेट या समित्यांमध्ये शिवसेनेचे संख्याबळ जास्त असल्याने या ठिकाणी सेनेचे वर्चस्व राहणार आहे. मुंब्रा आणि कळवा समितीअंतर्गत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या अधिक आहे, त्यामुळे या समितीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष निवडून येऊ शकतात. नौपाडा आणि उथळसर प्रभाग समितीमध्ये भाजपाचे अध्यक्ष निवडून येऊ शकतात. महापौर निवडणुकीनंतर लागणाऱ्या प्रभाग समितीच्या निवडणुकीतून हे चित्र दिसणार आहे. माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत असलेल्या प्रभाग १, २, ३, ८ मधून सेनेचे १२ आणि भाजपाचे ४ नगरसेवक निवडून आले आहेत. वर्तकनगरमधील प्रभाग ४, ५, ७ या १२ नगरसेवकांपैकी शिवसेनेचे ७ नगरसेवक निवडून आले आहेत.
लोकमान्यनगर, सावरकरनगरमध्ये असलेल्या ६, १३, १४ प्रभागांत शिवसेनेचे ८ सदस्य निवडले गेले. रायलादेवी प्रभाग समितीतील १५, १६, १७ प्रभागांतून शिवसेनेचे ८ सदस्य निवडून आले. वागळेत १८, १९ हे प्रभाग असून हे दोन्ही प्रभाग शिवसेनेच्या ताब्यात आले आहेत. तसेच दिवा उपप्रभागातून एकूण ११ सदस्यांपैकी ८ नगरसेवक शिवसेनेचे असल्याने ही समिती त्यांच्या ताब्यात राहील. याव्यतिरिक्त कळवा येथील प्रभाग ९, २३, २४, २५ मधून राष्ट्रवादीचे ९ नगरसेवक निवडले आहेत आणि मुंब्रा येथील प्रभाग २६, ३०, ३१, ३२ मधून १३ नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आले असून, या समितीवर त्यांचे वर्चस्व राहील.
नौपाडामधून प्रभाग २०, २१, २२ मध्ये १२ पैकी भाजपाचे ७ सदस्य निवडून आले. उथळसर प्रभाग समितीत असलेल्या प्रभाग १०, ११, १२ मध्ये भाजपाचे सहा, ४ राष्ट्रवादी, २ सेना असे संख्याबळ आहे. येथे भाजपाचा अध्यक्ष निवडला जाऊ शकतो.
दरम्यान, लोकमान्यनगर-सावरकरनगर ही समिती नव्याने स्थापन झाली असून आता २०१७ च्या बोर्डात दिवा या नावाने उपप्रभाग समिती तयार केल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांतून अध्यक्ष
१३१ नगरसेवकांच्या आकडेवारीत माजिवडा-मानपाडा, कळवा आणि मुंब्रा या समित्यांत प्रत्येकी १६ नगरसेवकांची प्रभाग समिती बनणार आहे. वर्तकनगर, लोकमान्यनगर-सावरकरनगर, रायलादेवी व नौपाडा या समितीत प्रत्येकी १२ नगरसेवकांना स्थान राहणार आहे. सर्वात छोटी वागळे प्रभाग समिती असून तेथे ८ नगरसेवक राहणार आहे. तसेच नव्याने तयार होणाऱ्या दिवा उपप्रभाग समितीत ११ नगरसेवक राहणार आहेत. या सर्व प्रभाग समित्यांत नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांमधून प्रभाग समिती अध्यक्ष बनणार आहेत.