कल्याणमध्ये रस्ते बुजविण्याचे निकृष्ट दर्जाचं काम शिवसेनेने पाडलं बंद; सत्ता यांची बोंबही हेच ठोकतात मनसेची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 07:47 PM2017-09-23T19:47:51+5:302017-09-23T19:48:44+5:30
शहराच्या पूर्व भागातील चक्कीनाका चौकात रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरु असल्याने हे काम शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज बंद पाडलं.
कल्याण- शहराच्या पूर्व भागातील चक्कीनाका चौकात रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरु असल्याने हे काम शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज बंद पाडलं. सत्ताधारी शिवसेनेचा कल्याण डोंबिवली महापालिकेतील प्रशासनावर कोणत्याही प्रकारचा वचक नसल्याने वीस वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेनेला रस्त्यावर उतरून काम बंद पाडण्याची वेळ आली आहे. मातीमिश्रित गिरीटने रस्ते बुजवण्याचे काम सुरु होते. तसेच त्यात चप्पलही सापडली. या कामांवर आयुक्तांचे नियंत्रण नसल्याने याला आयुक्तच जबाबदार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.
शिवसेना वीस वर्षे सत्तेत आहे. सत्ताही यांचीच आणि कामे चांगली झाली नाहीत याची बोंबही हेच ठोकताहेत अशी खरमरीत टिका मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी केली आहे. काळ्या यादीत असलेल्या कंत्रटदाराना कामे देणार तर कामे निकृष्ट नाही तर काय होणार असे कदम यांनी सांगितले.
खासदार श्रीकांत शिंदे हे महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी, दीपेश म्हात्रे, नवीन गवळी यांच्यासोबत आज चार वाजता चक्कीनाका येथे पोहचले. त्याठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु होते. त्याठिकाणी वापरण्यात येत असलेल्या साहित्याची तपासणी केली असता प्रथमदर्शी वापरण्यात येत असलेली गिरीट त्यात माती मिश्रित होती. माती मिश्रित गिरीट टाकल्याने ती एका पावसाच्या सरीत वाहून जाते. त्यामुळे बुजविलेले खड्डा हा पुन्हा उघडा पडतो. महापालिकेच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या निकृष्ट कामाचा पर्दाफाश केला आहे. 19 सप्टेंबर रोजी खासदार शिंदे यांनी महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेतली होती.
त्यावेळी आयुक्तांनी 2 सप्टेंबरपासून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली जाईल असे आश्वासन दिले होते. निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदाराला अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोपही शिंदे यांनी आयुक्तांच्यासोबत पार पडलेल्या बैठकी दरम्यान केला होता. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची कामे सुरु झालेली आहेत. त्याची पाहणी करण्यासाठी चक्कीनाका येथे अचानक खासदार शिवसेना नगरसेवकांसोबत पोहचले. यावेळी मातीमिश्रित गिरीटचा वापर करुन खड्डे बुजविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काम सुरु आहे. त्याठिकाणी महापालिकेचा एकही अधिकारी उपस्थित नाही. तसेच संबंधित कंत्राटदारही त्याठिकाणी उपस्थित नाही. निकृष्ट दर्जाची कामे करुन जनतेच्या पैशाची नासाडी सुरु आहे. आयुक्त वेलरासू हे कार्यालयाच्या बाहेर निघत नाहीत. कार्यालयात बसूनच काम करीत आहे. शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी हे देखील कार्यालयात बसून काम करीत आहेत. ठाण्यात कामे सुरु आहेत. ठाण्यातील आयुक्तांचा आदर्श वेलरासू यांनी घ्यावी असे शिंदे यांनी सांगितले