“भीती दाखवून खिसे कापा व राज्य करा असले राजकारण देशात सुरु”: सुषमा अंधारे
By धीरज परब | Published: October 15, 2022 07:20 PM2022-10-15T19:20:47+5:302022-10-15T19:22:54+5:30
सिंधुदुर्ग-रत्नागिरी गोव्याला आणि मुंबई गुजरातला जोडली तर आश्चर्य वाटायला नको इतके घाणेरडे राजकारण सुरु आहे, अशी घणाघाती टीका सुषमा अंधारे यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - भाजपाने राज्य करण्यासाठी लोकांची सहनशक्ती वाढवली व त्यांना संमोहित केले . त्यांनी एवढी महागाई वाढवली , जनतेचा खिसा कापला तरी लोकांनी बोलायचे नाही, केवळ नमो नमो म्हणायचे. लोक बोलले तर त्यांना देशभक्त नाहीत का ? हिंदू नाही का ? असे म्हणत देशद्रोही ठरवण्याची भीती दाखवून जनतेचे तोंड दाबून ठेवल्याची टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मीरारोड येथील महाप्रबोधन यात्रे वेळी केली . हिंदू म्हणायचे म्हणजे जनतेच्या बऱ्याच प्रश्नांपासून पळ काढण्यासाठी हे मोकळे असा आरोप भाजपा, शिंदे गट आदींवर केला .
मीरारोडच्या शिवार उद्यान येथे शिवसेना ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेची सभा झाली . यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले होते . शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत व खासदार राजन विचारे , संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर , ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे सह सेनेचे पदाधिकारी , माजी नगरसेवक आदी उपस्थित होते .
अंधारे म्हणाल्या की , हिंदूंचे आदर्श प्रभू श्रीरामाचे भाऊ लक्ष्मण यांनी वहिनी साठी जीवाची बाजी लावली . मात्र शिवसैनिक भाऊ दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नीच्या मार्गात अडथळे आणणारे हे बेगडी हिंदुत्ववादी आहेत . त्यांना सत्ता दिसल्याने फडणवीस यांच्या सोबत हम दिल दे चुके सनम आणि सत्ता जायला लागली म्हणून शिवसैनिकांसोबत हम आपके है कोन असे चालवले आहे . फडणवीस स्क्रिप्ट लिहून देणारे लेखक व शिंदे वाचक असल्याची टीका त्यांनी केली .
हे लोक महिलांचा आदर सन्मान करा म्हणतात पण राज्याला महिला बालकल्याण मंत्री नाही , एकही महिला मंत्रिमंडळात नाही . उद्या सिंधुदुर्ग - रत्नागिरी गोव्याला जोडली आणि मुंबई गुजरातला जोडली तर आश्चर्य वाटायला नको इतके घाणेरडे राजकारण सुरु आहे . स्वतःच्या स्वार्था साठी त्यांनी शिवसेनेला मतदान करणाऱ्या जनतेचा विश्वासघात केला अश्या गद्दारांना गाडून शिवसेना पुन्हा उभी राहील असे अंधारे म्हणाल्या .
शिवसेना नेते अरविंद सावंत म्हणाले की , ज्या मोदींना बाळासाहेबांनी व शिवसेनेने वाचवले त्याच मोदी - शहा यांनी शिवसेना संपण्यासाठी २०१४ सालंच्या निवडणुकीत २७ सभा घेतल्या . उद्धव ठाकरे एकटेव शिवसैनिक होते तेव्हा ठाण्यातले दाढीवले कुठे होते ? ठाण्याच्या बाहेर पडले तरी का ?. २०१९ सालच्या निवडणुकीत युती केली पण सेनेच्या उमेदवारांना पाडण्यासाठी भाजपाने माणसे उभी केली . रमेश लटकेंना पाडण्यासाठी त्यावेळी उभ्या केलेल्या मुरजी पटेल यांना अंधेरी पोटनिवडणुकीत यावेळी भाजपाने उमेदवारी दिली आहे . दिवंगत शिवसैनिक लटकेंच्या पत्नी यांना खोटे बनाव करून छळले जात आहे . प्रशासन गुलामा सारखे राबवले जात असल्याचा आरोप सावंत यांनी केला .
भाषणात अंधारे , सावंत , विचारे आदींनी भाजपा सह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिंदे गटातील काही आमदारांवर टीकेची झोड तसेच खोचक टोले लगावले . स्थानिक पोलिसां कडून सभेतील नेत्यांच्या भाषणावर बारीक लक्ष ठेवले जात होते . छायाचित्रण सह भाषणातील वक्तव्ये याची नोंद केली जात होती .
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"