शिवसेनेकडून भाजपाची ‘उपेक्षा’च , उपमहापौरपदावर केली बोळवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 07:02 AM2018-05-06T07:02:01+5:302018-05-06T07:02:01+5:30

कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदासाठी भाजपाचा दावा असताना भाजपाच्या कोअर कमिटीने पुढील विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महापौरपदाचा दावा सोडला आहे. त्यामुळे महापौरपदासाठी शिवसेनेतर्फे विनीता विश्वनाथ राणे, तर उपमहापौरपदासाठी भाजपातर्फे उपेक्षा शक्तिवान भोईर यांनी अर्ज भरले.

 Shiv Sena talked about BJP's "neglect" | शिवसेनेकडून भाजपाची ‘उपेक्षा’च , उपमहापौरपदावर केली बोळवण

शिवसेनेकडून भाजपाची ‘उपेक्षा’च , उपमहापौरपदावर केली बोळवण

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदासाठी भाजपाचा दावा असताना भाजपाच्या कोअर कमिटीने पुढील विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महापौरपदाचा दावा सोडला आहे. त्यामुळे महापौरपदासाठी शिवसेनेतर्फे विनीता विश्वनाथ राणे, तर उपमहापौरपदासाठी भाजपातर्फे उपेक्षा शक्तिवान भोईर यांनी अर्ज भरले. केडीएमसीत शिवसेना-भाजपाची युती कायम असल्याची कबुली दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी दिली आहे. दरम्यान, उपमहापौरपदासाठी अपक्ष नगरसेवक कासीब तानकी यांनीही उमेदवारी अर्ज भरल्याने उपेक्षा भोईर यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला. या नाट्यमय राजकीय हालचालींमुळे महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. महापौरपदासाठी भरलेला भोईर यांचा अर्ज मागे घेतला जाईल, असे भाजपा नेत्यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेनेचीच सरशी झाली आहे. दरम्यान, तानकी यांना स्थायी समितीचे सदस्यपद पुन्हा वर्षभरासाठी वाढवून दिले जाईल, असे आश्वासन चर्चेअंती त्यांना शिवसेनेच्या नेत्यांनी दिले आहे. मात्र, तानकी यांनी कोणतेही वक्तव्य करणे पसंत केले नाही.
२०१५ मधील महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीतील समझोत्यानुसार, अडीच वर्षांनंतर महापौरपद भाजपाला दिले जाईल, असे ठरले होते. मात्र, महापौरपदाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागताच आमचाच महापौर होईल, असा दावा शिवसेनेकडून केला जात होता. भाजपाकडूनही तसाच दावा केला जात होता. महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी शनिवारी अर्ज भरण्याची मुदत होती. त्यापूर्वी शिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये बराच खल झाला. पुढील विधानसभा व लोकसभा निवडणुकांची गणिते डोळ्यांसमोर ठेवून भाजपाने महापौरपदावरील दावा सोडला. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार उपमहापौरपदासाठी भोईर यांनी अर्ज भरल्याचे पक्षाचे गटनेते वरुण पाटील यांनी स्पष्ट केले. महापौरपदासाठी राणे यांनी अर्ज भरल्यानंतर शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे म्हणाले, ‘शिवसेना-भाजपामध्ये महापौरपदाबाबत कोणताच करार झालेला नव्हता. दोन्ही पक्षांच्या बैठकीत ठरल्यानुसार शिवसेनेने महापौरपदासाठी अर्ज दाखल केला. केडीएमसीतील शिवसेना-भाजपा युती कायम आहे, असे स्पष्ट केले. त्यामुळे आता अडीच वर्षांसाठीच महापौर होईल.’
सेना-भाजपाकडून अर्ज भरून झाल्यानंतर अपक्ष नगरसेवक तानकी यांनीदेखील उपमहापौरपदासाठी अर्ज भरला. ते समजताच भाजपाच्या भोईर यांनीही महापौरपदासाठी अर्ज दाखल केला. कारण, त्यांना तानकी यांच्यामुळे असुरक्षित वाटू लागले. शिवसेना राजकीय खेळी खेळत असल्याचा त्यांना संशय आला. तानकी हे अपक्ष असले, तरी त्यांनी शिवसेनेला समर्थन दिलेले आहे. सुरुवातीला तानकी यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षरी केलेल्या शकिला खान यांचा शोध शिवसेनेने घेतला. खान यांना पाचारण करून त्यांच्याकडून उपमहापौरपदासाठी अर्ज भरण्याच्या तयारीत शिवसेना होती. मात्र, अर्ज भरण्याची वेळ संपल्याने त्यांना अर्ज भरता आला नाही. परंतु, हा अर्ज भरला गेला असता, तर तानकी यांच्यासह खान यांचाही अर्ज बाद ठरला असता. या तांत्रिक मुद्यावर शिवसेना होती. ९ मे रोजी महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी १५ मिनिटे आधी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यावेळी तानकी यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडू, असा शिवसेनेचा दावा आहे. तसेच महापौरपदासाठीचा अर्ज भोईर मागे घेतील, असे भाजपाचे गटनेते पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
तानकी हे अपक्ष नगरसेवक असून त्यांना उपमहापौरपद हवे होते. यापूर्वी त्यांना स्थायी समितीत एक वर्ष सदस्यपदाची संधी दिली होती. त्यांना दोन वर्षे सदस्यपद हवे होते. त्यांना एक वर्ष वाढवून मिळाले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या तानकी यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरला. त्यानंतर, नॉटरिचेबल झालेल्या तानकी यांचा शिवसेनेने शोध घेऊन चर्चा केली. त्यानुसार, स्थायी समितीचे सदस्यपद पुन्हा एक वर्षासाठी वाढवून दिले जाईल, असे आश्वासन त्यांना दिल्याचे शिवसेना नेत्यांनी सांगितले. मात्र, तानकी यांनी काहीच भाष्य केले नाही. त्यामुळे ९ मे रोजीच खरे चित्र स्पष्ट होईल.

निष्ठावंत नाराज

महापौरपदासाठी कल्याण शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांच्या पत्नी वैशाली पाटील, कल्याण पूर्वेतून माधुरी काळे, तर डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख व सभागृह नेते राजेश मोरे यांच्या पत्नी भारती मोरे इच्छुक होत्या. त्याचबरोबर रमेश पाटील यांच्या पत्नीचे नाव स्पर्धेत होते.
इतर पक्षांतून आलेल्यांना महापौरपदाची संधी देऊ नये, असे मत निष्ठावंत शिवसैनिकांचे होते. विनीता यांना संधी दिल्याने जुने लोक नाराज झाल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे.
२७ गावांतील शिवसेनेच्या नगरसेविकेचाही विचार झाला होता. मात्र, शिवसेनेत खुल्या प्रवर्गातील नगरसेविका कमी होत्या. त्यामुळे विनीता यांची वर्णी लागली.

डोंबिवलीला महापौरपदाचा मान

शिवसेनेने १९९९ मध्ये अनिता दळवी यांना महापौरपदाची संधी दिली होती. त्यानंतर, डोंबिवलीला महापौरपद मिळाले नव्हते. शिवसेनेने आता डोंबिवली पश्चिमेतील विनीता राणे यांना महापौरपदाची संधी दिली आहे. त्या विश्वनाथ राणे यांच्या पत्नी आहेत. राणे हे शिवसेनेत होते. नारायण राणे समर्थक असलेले राणे नंतर काँग्रेसमध्ये गेले. २०१५ च्या निवडणुकीत ते पुन्हा शिवसेनेत आले. शिवसेनेतर्फे त्यांच्या पत्नीसह त्यांना उमेदवारी मिळाली.
ते कोकणातील असून डोंबिवली पश्चिमेत कोकणी मतदार अधिक आहेत. त्यांची मते वळवण्यासाठी व डोंबिवलीला न्याय देण्यासाठी शिवसेनेने हा निर्णय घेतला आहे. डोंबिवली शहर अध्यक्षपदासाठी विश्वनाथ राणे इच्छुक होते. त्यांच्याऐवजी राजेश मोरे यांना शहर अध्यक्षपद दिले गेले. त्यामुळे राणे हे नाराज होते. त्यांच्या पत्नीला महापौरपदाची संधी देऊन राणे यांची नाराजी पक्षाने दूर केली आहे.

 पालकमंत्र्यांना न दुखावण्याचा निर्णय

महापौरपद भाजपाला दिले व त्यांनी एक वर्षानंतर पद सोडले नाही, तर शिवसेनेवर सत्तेविना राहण्याची नामुश्की येईल. त्यामुळे शिवसेनेने महापौरपदावरील दावा सोडला नाही.

त्याचबरोबर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व खासदार कपिल पाटील हे महापौरपदासाठी शिवसेनेच्या तुलनेत आग्रही नव्हते. पालकमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना व भाजपामधील दुवा आहेत. त्यामुळे कल्याणच्या महापौरपदासाठी शिंदे यांना दुखावणे मुख्यमंत्र्यांनी पसंत केलेले नाही.

आगरी-कोळी समाजावर अन्याय

भाजपा नगरसेवक विकास म्हात्रे यांनी सांगितले की, केडीएमसीत शिवसेना व भाजपामध्ये एकूण ६३ नगरसेवक हे आगरी-कोळी समाजाचे आहेत. शिवसेना व भाजपाने आगरी समाजाला महापौरपदाची संधी आजतागायत दिलेली नाही.

डोंबिवलीचे पुंडलिक म्हात्रे हे राष्ट्रवादीत होते. तेव्हा राष्ट्रवादीने आगरी समाजाला महापौरपदाची संधी दिली होती. शिवसेना-भाजपा आगरी व कोळी समाजाच्या सदस्याचा विचार का करत नाही, याचा पक्षांनी गांभीर्याने विचार करायला हवा.

भाजपाचे नगरसेवक दया गायकवाड यांनी सांगितले की, पक्षाने मागासवर्गीय उमेदवाराचा विचार महापौर व उप महापौरपदासाठी केलेला नाही. त्यामुळे माझी नाराजी आहे, याची पक्षाने दखल घ्यावी.

Web Title:  Shiv Sena talked about BJP's "neglect"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.