“...तर आनंद दिघेंचा पुतण्या म्हणून १०० टक्के निवडणूक लढेन”; केदार दिघे स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 02:52 PM2024-03-28T14:52:57+5:302024-03-28T14:54:58+5:30
Kedar Dighe News: जो शिष्य आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेला आहे, तो कधीही गद्दारी करू शकत नाही. तुम्हाला समाजाने शाबासकी द्यायला हवी. स्वतःहून सांगत फिरणे यात फरक आहे, असा टोला केदार दिघेंनी लगावला.
Kedar Dighe News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात उमेदवार म्हणून कल्याण लोकसभेसाठी माझ्या नावाचा विचार केला जात आहे, हे मीडियातून मला समजले. मात्र, ठाकरे गटात अगदी बाळासाहेब ठाकरे असो, आनंद दिघे असो यांच्यापासून एक प्रथा आहे की, नेत्यांनी आणि पक्षप्रमुखांनी आदेश द्यावा आणि कार्यकर्त्यांनी त्याचे पालन करावे. अद्याप माझी वैयक्तिक पातळीवर याविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही. परंतु, पक्षाने आणि पक्षश्रेष्ठींनी, पक्षप्रमुखांनी सांगितले तर, १०० टक्के एक कार्यकर्ता, ठाणे जिल्हाप्रमुख तसेच आनंद दिघे यांचा पुतण्या म्हणून निवडणूक लढेन, असे केदार दिघे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
ठाकरे गटाकडून १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये ठाण्यातून राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कल्याणमधून कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे लक्ष लागले आहे. कल्याण लोकसभेसाठी आनंद दिघे यांचे पुतणे असलेले केदार दिघे यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात मीडियाशी बोलताना केदार दिघे यांनी सदर प्रतिक्रिया दिली. तसेच ठाणे असो, कल्याण असो किंवा संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा कोणताही उमेदवार असो, त्यांच्यासाठी काम करणे, प्रचार करणे आमचे कर्तव्य आहे, असे केदार दिघे यांनी सांगितले.
राजन विचारे यांची हॅटट्रिक होणार आहे
ठाकरे गटाचे आणि महाविकास आघाडीच्या जाहीर झालेल्या उमेदवारांना शुभेच्छा देतो. उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातून राजन विचारे यांना उमेदवारी दिली आहे. आम्हा सर्व शिवसैनिकांना शाश्वती आहे की, यावेळी राजन विचारे यांची हॅटट्रिक होणार आहे. लोकांच्या मनात राजन विचारे यांनी केलेली कामे आहेत. तसेच आतापर्यंत राजन विचारे यांची निष्ठा आणि आनंद दिघे यांच्याबद्दल असलेली प्रेमाची भावना तसेच त्यांनी दिलेले संस्कार हे खऱ्या अर्थाने हा शिष्य पुढे घेऊन जात आहे, यात कुठेही किंतु-परंतु नाही, असे केदार दिघे यांनी सांगितले.
ठाण्यातील निवडणूक ही आनंद दिघे यांचे नाव घेऊन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरची ही पहिलीच निवडणूक असणार आहे. एकीकडे राजन विचारे हे आनंद दिघे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हेदेखील आनंद दिघे यांचा वारसा पुढे घेऊन जात असल्याचे सांगतात. त्यामुळे ही निवडणुकीत कडवी झुंज पाहायला मिळणार का, यावर बोलताना, समाजात वावरत असताना, राजकारणात आणि समाजकारण करत असताना एखाद्या उमेदवाराला किंवा व्यक्तीला समाजाकडून ती शाबासकीची थाप मिळणे आणि स्वतःहून सांगणे की, आम्हीच त्यांचे खरे शिष्य आहोत, यामध्ये खूप फरक आहे. लोकांना माहिती आहे की, जो शिष्य आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेला आहे, तो कधीही गद्दारी करू शकत नाही. त्यांनी नेहमी निष्ठाच बाळगली आहे. कारण आनंद दिघे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत वंदनीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षाप्रती निष्ठा ठेवली. शिवसेना म्हटली की, ती ठाकरेंचीच होऊ शकते, असे केदार दिघे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.