उल्हासनगरात जुगार अड्ड्याची शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून तोडफोड
By सदानंद नाईक | Published: March 21, 2023 05:39 PM2023-03-21T17:39:22+5:302023-03-21T17:39:42+5:30
शहरातील कॅम्प नं-४ व ५ परिसरातील जुगार अड्ड्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी धडक देऊन तोडफोड केली.
उल्हासनगर - शहरातील कॅम्प नं-४ व ५ परिसरातील जुगार अड्ड्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी धडक देऊन तोडफोड केली. या जुगार अड्डयानें शेकडो कुटुंब उध्वस्त होत असून पोलिसांनी स्वतःहून कारवाई केली नाहीतर, महिला त्यांची तोडफोड करून त्याची जबाबदारी पोलिसांवर राहील. असा इशारा महिला कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.
उल्हासनगरातील चौकाचौकात, रस्त्याने, मार्केट मध्ये अवैध धंद्याचे पेव फुटले असून सर्वसामान्य नागरिकांची यामध्ये फसगत होते. आमदार कुमार आयलानी यांनी शहरातील अवैध धंदे, जुगार, ऑनलाईन लॉटरी, गावठी दारूचे अड्डे याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करून कारवाईची मागणी केली. मात्र कागदावर कारवाई झाल्यावर अवैध धंदे जैसे थे सुरू आहेत. झोपडपट्टीतील शेकडो कुटुंब यामुळे उधवस्थ झाले.
सोमवारी सायंकाळी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला शहरप्रमुख ज्योती तेजी यांच्या नेतृत्वाखाली असंख्य महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लालचक्की, जयजनता कॉलनीसह अन्य ठिकाणच्या जुगार अड्ड्यावर धडक देऊन तोडफोड केली. याप्रकारने एकच खळबळ उडून पोलीस कारवाईचे पितळ उघडे पडले.
शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांच्या आक्रमक पावित्र्याने, स्थानिक पोलिसांनी अवैध धंद्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली. यापुढे असे अवैध धंदे सुरू राहिल्यास पोलीस कारवाईपूर्वी शिवसेना महिला आघाडी त्यांना धडा शिकवेल. असा इशारा ठाकरे गटाच्या शहराध्यक्षा तेजी यांनी दिल्या. अवैध धंद्याच्या तोडफोडीने अवैधधंदे धारकांचे धाबे दणाणले असून पोलीस कारवाईचे पितळ उघडे पडले आहे.