युतीवरून शिवसेना अडचणीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 06:37 AM2017-08-07T06:37:30+5:302017-08-07T06:37:30+5:30
राज्यात यापुढे कुठेही भाजपाशी युती केली जाणार नाही, अशी घोषणा खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली असतानाही मीरा-भार्इंदरच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपापुढे युतीचा प्रस्ताव ठेवला होता आणि तो भाजपाने फेटाळल्याचा गौप्यस्फोट आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरो रोड/भार्इंदर : राज्यात यापुढे कुठेही भाजपाशी युती केली जाणार नाही, अशी घोषणा खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली असतानाही मीरा-भार्इंदरच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपापुढे युतीचा प्रस्ताव ठेवला होता आणि तो भाजपाने फेटाळल्याचा गौप्यस्फोट आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजपाच्या डोक्यात हवा गेल्यानेच त्यांनी हा प्रस्ताव फेटाळल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर युतीचा प्रस्ताव कोणत्याही शिवसेना नेत्याने दिला नव्हता, उलट आम्ही आधीपासूनच स्वबळावर लढण्याची तयारी केली होती, असे प्रत्त्युत्तर आमदार नरेंद्र मेहता यांनी दिले.
त्यामुळे उद्धव यांचा आदेश डावलून शिवसेनेच्या कोणत्या नेत्यांने युतीचा प्रस्ताव देत मानहानी पदरात पाडून घेतली, अशी चर्चा शिवसैनिकांत रंगली आहे.
भाजपाने युतीचा प्रस्ताव फेटाळल्याची माहिती देतानाच सरनाईक यांनी भाजपा हा मोठा भाऊ असल्याचेही पत्रकार परिषदेत जाहीर केले. तो शिवसेनेचा मोठा असल्याचे आम्ही आजही मानतो. परंतु, कोण मोठा व कोण लहान हे या निवडणुकीत मतदारच ठरवेल आणि ते निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला आमदार रवींद्र फाटक, युवासेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक, उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर, पदाधिकारी अरुण कदम उपस्थित होते.
भाजपाने काही निवडणुकांत बहुमताने विजय संपादन केल्याने त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत भाजपाला युती करण्याची गरज नसल्याचा कांगावा त्यांच्या काही नेत्यांनी केला आणि शिवसेनेच्या युतीचा प्रस्ताव धुडकावला. त्याचा उलटा परिणाम भाजपावर होऊ लागला आहे. निष्ठावंतांना डावलून पक्षाचा संबंध नसलेल्यांना संधी दिली जात असल्याने भाजपात नाराजी पसरु लागली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सुरुवातीला भाजपाने सर्व जागांवर विजय मिळविणार असल्याचा दावा केला होता. नंतर हा आकडा ७० वर स्थिरावला. आता तर भाजपाने शिवसेनेसोबत काँटे की टक्कर असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आमचा युतीचा प्रस्ताव झिडकारुन स्वबळावर लढण्याचा दावा त्यांच्या अंगाशी येऊ लागला आहे. शिवसेनेला दुय्यम स्थान देणाºयांना आमची ताकद कळू लागल्याचा दावा त्यांनी केला.
केंद्र व राज्यात भाजपासोबत शिवसेनेची युती असली तरी त्यांच्या भ्रष्टाचाराला आम्ही समर्थन देत नाही. तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसेंवर भ्रष्टाचाराचा आरोप झाला. अलिकडेच एसआरए प्रकरणात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावरही आरोप झाला. आता पालिका निवडणुकीतही भाजपा मतदारांना आमिषे दाखवत भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे. प्रभाग चारमध्ये भाजपाकडून मतदारांना कुकर व चांदीच्या राखीचे खुलेआम वाटप केले जात आहे. त्याची तक्रार निवडणूक प्रशासनाकडे करुनही कारवाई केली जात नसल्याने प्रशासन भाजपाच्या मंत्र्यांच्या दबावाखाली काम करीत असल्याचे सिद्ध होत आहे, असा आरोप आमदारांनी केला. प्रशासनाने भाजपाच्या दबावाखाली काम सुरु ठेवल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि त्याला प्रशासनच जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला.
पाण्यापासून मेट्रोपर्यंतच्या मागण्या शिवसेनेने पूर्ण केल्या. त्याचा गंध भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाला नाही, असा टोला त्यांनी नरेंद्र मेहता यांना लगवाल. क्लस्टर योजनेची त्यांना माहिती नाही. त्यामुळे कामे केल्याचा त्यांंचा दावा खोटा असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला.
सेना नेत्यांचा तोल ढळला : मेहता
शिवसेनेच्या एकाही नेत्याने युतीचा प्रस्ताव दिला नव्हता. आमदार प्रताप सरनाईकांची कामाची पध्दत चुकीची आहे. विकास कामे आम्ही केली आणि त्यांनी फक्त श्रेय लाटण्याचे काम केले. त्यामुळे आमची स्वबळावर लढण्याची इच्छा होती. त्याची तयारी आम्ही आधीपासून केली होती.
विकासाचे दावे करणाºयांना ठाण्यात गेल्या पंचवीस वर्षांत विकास करता आला नाही. तो आम्ही फक्त अडीच वर्षांत मीरा-भार्इंदरमध्ये केला. भाजपाने भ्रष्टाचार केल्याचा आरोप तर शिवसेनेचे नेते करीत असतील, तर सत्तेत ते आमच्यासोबतच होते. तेव्हा ते का गप्प बसले? भाजपाने आचारसंहितेचा भंग केलेला नाही. उलट शिवसेनेतील नेत्यांचा तोल ढासळू लागल्यानेच ते बेलगाम आरोप करत आहेत.
‘भाजपाचे काम खाण्याचे’
भार्इंदर : खाणार नाही आणि खाऊ देणार म्हणत, पारदर्शकतेचा नारा देणाºया भाजपाचे नेते जमेल ते खात सुटले आहेत. अगदी चिक्कीही त्यांनी खाल्ली, असा चिमटा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी रविवारी काढला. मीरा-भार्इंदरच्या निवडणुकीतील पक्षाच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपा, शिवसेनेवर सडकून टीका केली. सविस्तर/२
५०९ उमेदवार रिंगणात
भार्इंदर : डिजिटल व्यवस्था हाताशी असून आणि आठ निवडणूक अधिकारी, त्यांची कार्यालये हाताशी असूनही या निवडणुकीत ५०९ उमेदवार रिंगणात असल्याचे रविवारी स्पष्ट झाले. या निवडणुकीत ६७७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यातील ७० अर्ज बाद झाले. ९८ उमेदवारी अर्ज मागे घेतले.