ठाण्यातील उत्तर भारतीय मेळावा तूर्तास रद्द; उद्धव ठाकरेंचा निर्णय, नेमके कारण काय? पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 08:17 PM2023-07-21T20:17:07+5:302023-07-21T20:19:43+5:30
Shiv Sena Thackeray Group News: उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात ठाकरे गटाचा उत्तर भारतीय मेळावा ठाण्यात आयोजित करण्यात आला होता.
Shiv Sena Thackeray Group News: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. मनिषा कायंदे, शिशिर शिंदे यांच्यानंतर नीलम गोऱ्हेंनी ठाकरे गटाला रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. विधान परिषदेत नीलम गोऱ्हे यांचे उपसभापतीपद कायम असल्याचा निर्णय देण्यात आला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणीसाठी विदर्भाचा दौराही केला. यातच आता ठाण्यात ठाकरे गटाच्या वतीने होणारा उत्तर भारतीय मेळावा तूर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
अलीकडेच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी बंगळुरू येथे विरोधी पक्षांच्या बैठकीला हजेरी लावली होती. उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार, विरोधकांच्या INDIA या आघाडीचे स्लोगन, टॅगलाइन निश्चित करण्यात आली. विरोधी आघाडीची टॅगलाइन हिंदीत असावी, असे उद्धव ठाकरे यांनी सूचवले होते. त्यानंतर ‘जीतेगा भारत’ ही टॅगलाइन ठरवण्यात आली. विरोधी पक्षांची पुढील बैठक मुंबईत होणार आहे. विरोधकांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे ठाण्यात उत्तर भारतीय मेळाव्याला जाणार होते. मात्र, हा मेळावा तूर्तास रद्द करण्यात आला आहे.
ठाण्यातील उत्तर भारतीय मेळावा तूर्तास रद्द
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उद्या ठाकरे गटाचा ठाण्यात उत्तर भारतीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा पार पडणार होता. पण हा मेळावा तूर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्यात गडकरी रंगायतनमध्ये हा मेळावा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. रायगडच्या खालापूर येथे इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली. या दुर्दैवी दुर्घटनेमुळे ठाकरे गटाचा उत्तर भारतीय मेळावा तूर्तास रद्द करण्यात आला आहे.
हा मेळावा आता पुढच्या आठवड्यात होईल
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये होणारा उत्तर भारतीय मेळावा तूर्तास रद्द करण्यात आला आहे. हा मेळावा आता पुढच्या आठवड्यात होईल, अशी माहिती विनायक राऊत यांनी दिली.