शिवसैनिकांकडून वाहतुकीचे नियम पायदळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 01:42 AM2019-09-19T01:42:37+5:302019-09-19T01:42:40+5:30

शिवसेना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची गेल्या दोन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे.

Shiv Sena violates the rules of transportation | शिवसैनिकांकडून वाहतुकीचे नियम पायदळी

शिवसैनिकांकडून वाहतुकीचे नियम पायदळी

Next

ठाणे : शिवसेना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची गेल्या दोन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. विजय संकल्प मेळाव्यानिमित्त ते अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांसह युवकांच्या भेटीगाठीही घेत आहेत. या यात्रेदरम्यान त्यांच्यामागे अनेक कार्यकर्ते मात्र विनाहेल्मेट तसेच सिटबेल्ट न लावताच पोलिसांच्या साक्षीने वाहने हाकत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. त्याआधीच शिवसेना आणि भाजप या दोन्ही राजकीय पक्षांच्या यात्रा राज्यभर धुराळा उडवत आहेत. आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा पालघरमधील नालासोपारा येथून ठाण्यात मंगळवारी सायंकाळी दाखल झाल्यानंतर त्यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत झाले. त्यावेळी आदित्य यांनी उपस्थितांना अभिवादन करीत ओवळा, मानपाडा येथून मार्गक्रमण केले. खोपट, टेंभी नाकामार्गे एनकेटी सभागृह येथे यात्रेचा मंगळवारी समारोप झाला. मानपाडा भागातून घोडबंदर रोडने जनआशीर्वाद यात्रेची बस मार्गक्रमण करीत असताना अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. ही वाहतूककोंडी नियंत्रणात आणताना पोलिसांचीही मोठ्या प्रमाणात कसरत झाली. त्यावेळी अनेक कार्यकर्ते हे मोटारसायकलने भरधाव जात होते. यातील अनेक जण तर सर्रास ट्रिपल सिटही होते. बहुसंख्य कार्यकर्त्यांनी हेल्मेटचाही वापर केलेला नव्हता. आश्चर्य म्हणजे या यात्रेच्या मागे कारमधून जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांनीही सीटबेल्टचा वापर केलेला नव्हता. वाहतूक पोलिसांचा बहुतांश वेळ वाहतूक सुरळीत करण्यातच जात असल्यामुळे तेही विनाहेल्मेट आणि भन्नाट वेगाने जाणाºया मोटारसायकली तसेच वाहनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र होते. एकीकडे युवराज आदित्य नवा महाराष्टÑ घडविण्यासाठी युवकांच्या भेटी घेत असताना वाहतुकीचे नियम मात्र पायदळी तुडविले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. दरम्यान, नागपूर येथेही अशाच प्रकारे भाजपच्या यात्रेदरम्यान वाहतुकीचे नियम पायदळी तुडविल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी तिथे कारवाईला सुरुवात केली आहे. ठाण्याबरोबर अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवली या भागातून अशाच प्रकारे जनआशीर्वाद यात्रा जात होती. ठाणे पोलीस या सर्व भागातील वाहतुकीचे नियम तोडणाºयांवर कशी कारवाई करतात, असा सवालही सामान्य नागरिकांकडून केला जात आहे.
>मोठ्या दंडाची तरतूद करणाºया केंद्राच्या सुधारित मोटार वाहन कायद्यास राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विरोध दर्शवला आहे. म्हणूनच मोटार वाहन कायद्याचे सर्रास उल्लंघन करुन शिवसैनिक आपल्या पक्षाच्या नेत्याच्या याच भूमिकेची रि तर ओढत नाही ना, अशी उपरोधिक टिका या पार्श्वभूमिवर सर्वस्तरातून केली जात आहे.

Web Title: Shiv Sena violates the rules of transportation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.