शिवसेनेने ठाण्याची लावली वाट; सामाजिक संघटनांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 01:48 AM2019-04-27T01:48:28+5:302019-04-27T06:46:15+5:30
आनंद परांजपेंना दिला पाठिंबा
ठाणे : देशात २०१४ साली बहुमताने भाजपाचे सरकार आले. त्यांच्याकडून सगळ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. परंतु, गेल्या पाच वर्षांत भाजप सरकार फेल ठरले. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर कधी बोलले गेले नाही. त्यातही युतीचे उमेदवार राजन विचारे यांचा आताचा वचननामा पाहून तर भ्रमनिरास झाला. २५ वर्षे सत्तेवर असतानाही शिवसेनेने ठाण्याची वाट लावली, त्यामुळे या निवडणुकीत आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय ठाण्यातील विविध सामाजिक संस्था, संघटनांनी घेतला आहे.
ठाण्यात शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे, विश्वास उटगी, जगदीश खैरालिया, मतीन शेख आदी उपस्थित होते. आघाडी सरकारच्या काळात आमचे प्रश्न ऐकून घेतले जायचे, त्यावर चर्चा व्हायची. या पाच वर्षांत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांशी सरकारदरबारी चर्चा झालेली नाही आणि झाली असलीच, तरी त्याची अंमलबजावणी मात्र झालेली नाही. मोदी सरकारची सुरू असलेली वाटचाल लोकशाहीची हत्या आणि अभिव्यक्तीचे हनन करण्यासाठी आहे, असे वाटते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत युतीला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रातील ४८ उमेदवारांना आम्ही पाठिंबा देत आहोत, असे मत डॉ. संजय मं.गो. यांनी व्यक्त केले. ठाण्यात तरुणांची बेरोजगारी, एन्व्हॉयर्नमेंटल कन्सल्टंट, पाण्याची व्यवस्था आणि क्लस्टर हे प्रश्न असून आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी ते सोडवावे, अशी अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.
सध्या मोदींची पावले हुकूमशाहीकडे वळलेली आहेत. कामगार, शेतकरी एकूणच सर्वसामान्य जनता असुरक्षित आहे. नोटाबंदीमध्ये याच कामगार, शेतकरी, छोट्या दुकानदारांचे खूप नुकसान झाले आणि प्रत्यक्षात काळे पैसेवाल्यांचा फायदा झाला. आज हुकूमशाहीकडे जाणारी पावलं अर्थात काही दोनतीन माणसे जो निर्णय घेतात आणि संसदेला, सर्वोच्च न्यायालयाला टांगून ठेवतात, हे चुकीचं आहे. अजित डोवाल हे तर राष्ट्रीय सल्लागार आहेत की, पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार आहेत, हा एक प्रश्नच आहे, असे विश्वास उटगी म्हणाले.
भ्रष्टाचारात अडकलेल्यास निवडून देऊ नका
नंदलाल समितीच्या भ्रष्टाचारात राजन विचारे अडकलेले होते. त्यामुळे अशा भ्रष्टाचारात अडकलेल्या माणसाला निवडून देऊ नये, असे जगदीश खैरालिया म्हणाले.