लॉकडाऊन रद्द न झाल्यास शिवसेना उतरणार रस्त्यावर, वामन म्हात्रे यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 10:11 AM2021-05-10T10:11:02+5:302021-05-10T10:11:37+5:30
शनिवारी माजी नगराध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी ८ मे पासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन रद्द करण्याबाबतचे निवेदन उपमुख्याधिकारी सुभाष नागप यांना दिले.
बदलापूर : बदलापुरात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. मात्र त्यानंतरही शहरात लॉकडाऊनचा गोंधळ सुरूच आहे. गरज नसताना कुणाच्या तरी दबावाखाली घाईघाईने नागरिकांवर हा लॉकडाऊन लादण्यात आला असल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी केला आहे. हा लॉकडाऊन रद्द करण्याबाबत उद्यापर्यंत निर्णय न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला.
शनिवारी माजी नगराध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी ८ मे पासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन रद्द करण्याबाबतचे निवेदन उपमुख्याधिकारी सुभाष नागप यांना दिले. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान म्हात्रे यांनी कडक लॉकडाऊनच्या आदेशातील अनेक त्रुटींकडे लक्ष वेधले. सध्या शहरात राज्य सरकारने लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. या काळात शहरात कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. कोरोना रुग्णांचा मृत्युदर मुंबई महानगर क्षेत्रातील इतर शहरांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. पालिका प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या मागणीमुळे हा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यानुसार मेडिकल, दवाखाने, बँक वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत.
दूध, भाजीपाला, किराणा आणि इतर गोष्टी घरपोच देण्याची परवानगी आहे. मात्र शहरात अशी सुविधा देणारे किती विक्रेते आहेत त्यांची यादी, मोबाइल नंबर वा वेबसाइटची माहिती नागरिकांना देण्यात आलेली नाही. अत्यावश्यक सेवेतील हजारो नागरिक दररोज मुंबई वा अन्य शहरात नोकरीसाठी जात असतात. त्यांना ये-जा करण्यासाठी रिक्षांची गरज असते. परंतु रिक्षा सेवा सुरू राहणार की नाही? याबाबत आदेशात काहीही नमूद करण्यात आलेले नाही. लॉकडाऊनमध्ये गोरगरीब नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून रेशन दुकानातून मोफत अन्नधान्य देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यांनी या कडक लॉकडाऊन काळात धान्य कसे मिळवावे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
ग्रामीण नागरिकांना शहराचे दरवाजे बंद
बदलापूर शहरात जवळच्या ग्रामीण भागातील आदिवासी, शेतकरी शेतमाल विक्रीसाठी बदलापुरात येत असतात. मात्र कडक लॉकडाऊनमुळे या लोकांना शहराचे दरवाजे बंद झाले आहेत? असे अनेक प्रश्न म्हात्रे यांनी उपस्थित केले आहेत. कुणाच्या तरी दबावाखाली कडक लॉकडाऊनचे आदेश काढले असून, त्याला शिवसेना शहरप्रमुख म्हणून माझी हरकत असल्याचे त्यांनी सांगितले.