ठाणे जिल्ह्यात आवाजऽऽऽ युतीचाच, मोदीलाटेने घडला चमत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 03:34 AM2019-05-24T03:34:20+5:302019-05-24T03:34:52+5:30
ठाणे जिल्ह्यातील लोकसभेच्या ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघांवर शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीने अपेक्षेप्रमाणे आपले वर्चस्व कायम राखले आहे.
- नारायण जाधव
ठाणे जिल्ह्यातील लोकसभेच्या ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघांवर शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीने अपेक्षेप्रमाणे आपले वर्चस्व कायम राखले आहे. पक्ष कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे अन् नरेंद्र मोदीलाटेची लाभलेली जोड यामुळे प्रतिस्पर्धी काँगे्रस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या उमेदवारांचा २०१४ पेक्षा जास्त मतांनी दणदणीत पराभव झाला. मतदारांनी उमेदवारांपेक्षा प्रखर राष्ट्रवादावर स्वार झालेल्या मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी युतीच्या पारड्यात आपले मत टाकल्याचे निकालावरून दिसत आहे. विजयी व पराभूत उमेदवारांच्या मतांमधील अंतर इतके आहे की, बहुजन वंचित आघाडीने महाआघाडीच्या उमेदवारांना अपशकुन केला, असे म्हणण्यास वाव नाही.
ठाण्यात शिवसेनेचे राजन विचारे यांनी राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांचा चार लाखांहून अधिक मतांनी, कल्याणमध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांचा साडेतीन लाखांहून अधिक मतांनी, तर भिवंडीतून भाजपाचे कपिल पाटील यांनी काँगे्रसच्या सुरेश टावरे यांचा दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव करून विरोधकांचे अंदाज ठाणे खाडीत बुडवले आहेत. राज ठाकरे यांचा करिष्मा जिल्ह्यात कुठेच चालला नसल्याचे निवडणूक निकालावरून दिसत आहे.
या निकालांनी आगामी विधानसभा निवडणुकीत बेलापूर, ऐरोली, कळवा-मुंब्रा, शहापूर या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांना भगदाड पडण्याची भीती निर्माण झाल्याने तेथील विद्यमान आमदार संदीप नाईक, जितेंद्र आव्हाड, पांडुरंग बरोरांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्वेसर्वा माजी मंत्री गणेश नाईक यांची चिंता वाढवली आहे.
ठाणे मतदारसंघात सुरुवातीपासून राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नव्हता. गणेश नाईक आणि त्यांचे पुत्र संजीव नाईक यांनी शरद पवार यांच्या आग्रहानंतरही रिंगणातून माघार घेतली. यामुळे शिवसेना-भाजपा युतीने सोशल मीडियावरून विरोधकांना उमेदवारच मिळत नसल्याचा जोरदार प्रचार केला. राजन विचारे यांनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच आपला प्रचार सुरू केला होता. त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादीने ठाणे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आनंद परांजपे यांची उमेदवारी जाहीर केली. स्वत: गणेश नाईक यांनीच त्यांच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. नवी मुंबई, मीरा-भार्इंदरमध्ये नाईकांनी जोरदार जोर लावला. भार्इंदरमध्ये त्यांना काँगे्रसच्या मुझफ्फर हुसेन यांची चांगली साथ मिळाली. परांजपे यांनी सोशल मीडियासह जोरदार प्रचार सुरू केला. शिक्षण, गुन्हेगारी पार्श्वभूमी या मुुद्यांचा त्यांनी खुबीने प्रचार केला. त्याचा त्यांना प्रचारात फायदा दिसत होता. मात्र, ठाणे शहरातील नाईक-आव्हाड गटांतील दुफळी आणि संघटनात्मकदृष्ट्या कमजोर बांधणी, याचा त्यांना फटका बसला. भाजपच्या नगरसेवकांनी प्रारंभी असहकार पुकारला होता. मात्र ठाणे, नवी मुंबईतील शिवसैनिकांनी घेतलेली मेहनत, एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व आणि नरेंद्र मोदी यांचा करिश्मा त्यांच्या मदतीला धावून आले.
कल्याण मतदारसंघ सुरुवातीपासून जनसंघ, नंतर भाजप आणि शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. येथून शिवसेनेच्या डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात राष्ट्रवादीने ठाणे महापालिकेतील नगरसेवक बाबाजी पाटील यांना उमेदवारी दिली होती. ज्या दिवशी बाबाजींची उमेदवारी जाहीर झाली होती, त्याच दिवशी श्रीकांत शिंदे यांचा विजय निश्चित मानला जात होता. किंबहुना, ठाण्याच्या बदल्यात कल्याण, अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगली होती. मात्र, प्रश्न होता, तो २०१४ चे मताधिक्य तोडण्याचा. राष्ट्रवादीने कल्याण मतदारसंघातील आगरी-कोळी मतदारांंची संख्या लक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली असली तरी २७ गावांतील ग्रामीणपट्टा सोडला, तर ते संपूर्ण मतदारसंघात मतदारांसाठी अपरिचित होते.
सॅटीस पुलाखाली एलईडी स्क्र ीन
लोकसभा निवडणूक निकालाची माहिती तातडीने मिळावी, यासाठी सकाळीच भाजपने ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील सॅटीसखाली एलईडी स्क्र ीन लावली होती. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत लोकसभेचा निकाल पाहण्यासाठी पुलाखाली आणि पुलावरही नागरिकांनी गर्दी केल्याचे पाहण्यास मिळाले. दरम्यान, दुपारी स्थानिक नगरसेवक संजय वाघुले यांनी स्टेशन परिसरात विजयी जल्लोष केला.
लोकसभेचा निकाल भाजपच्या बाजूने लागेल, असे गृहीत धरून भाजपने सॅटीस पुलाखाली एक नंबर फलाटाबाहेर एलईडी स्क्रीन लावली होती. त्यामुळे रेल्वेस्थानकातून येजा तसेच रिक्षाने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी तसेच सॅटीस पुलावरील टीएमटी प्रवाशांनी लोकसभेचा निकाल पाहण्यासाठी काही वेळ काढून तेथे गर्दी केली होती. या स्क्रीनवर हिंदी आणि मराठी भाषांतील न्यूज चॅनल दाखवले जात होते.
बंदोबस्तावरील पोलीस उपाशी
ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या ठिकाणी गुरुवारी सुमारे ७०० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. चोख बंदोबस्तामुळे याठिकाणी रात्री उशिरापर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. परंतु, बंदोबस्तावरील अनेक कर्मचाºयांना दुपारचे जेवण आणि पाणीही मिळाले नसल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मतमोजणी केंद्रात सरकारी कर्मचाºयासाठी जेवणाची व्यवस्था केलेली असताना त्या केंद्राच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांपर्यंत जेवण घेवून जाण्याची तसदी कुणीही न घेतल्याने पोलिसांना उपाशी रहावे लागले. पत्रकार जेंव्हा मतमोजणी केंद्रात पोहोचले तेंव्हा ही व्यथा त्यांनी त्यांच्याकडे कथन केली. पत्रकारांनी ही बाब मतमोजणी केंद्रातील अधिकाºयांच्या निदर्शनास आणेपर्यंत जेवण संपले असल्याने अधिकाºयांचा नाईलाज झाला. त्यामुळे जनतेच्या सुरक्षेसाठी सदैव सज्ज असलेले पोलीसदादा उपाशीच राहिले.
मतदार सोडाच, मतदारसंघातील काँगे्रस-राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते अन् नेत्यांनाही ते अपरिचित होते. कल्याण-डोंबिवलीसारख्या सांस्कृतिक नगरीच्या प्रश्नांची त्यांना कोणतीही जाण नव्हती. तसेच कळवा-मुंब्य्रातील मतदारांनीही त्यांना पसंती दिलेली दिसली नाही. याउलट, मतदारसंघात खासदार म्हणून श्रीकांत शिंदेंनी केलेली कामे त्यांना फायदेशीर ठरली. यात कल्याण-मुरबाड मार्गासह भिवंडी-कल्याण मेट्रोच्या भूमिपूजनाचाही त्यांना लाभ झाला.
कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांत शिवसेनेसह भाजपचे भक्कम जाळे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी फौज आहे. एकीकडे पालकमंत्री एकनाथ शिंदे अन् दुसरीकडे राज्यमंत्री व भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांचा सर्वदूर जनसंपर्क, उल्हासनगरातील कलानी कुटुंबाची मिळालेली साथ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोदीलाट. अशा सर्वच बाबी एकत्र आल्याने श्रीकांत शिंदे यांचा कल्याण मतदारसंघात साडेतीन लाखांहून अधिक मतांनी दणदणीत विजय झाला.
जिल्ह्यात सर्वात जास्त चर्चेत राहिली, ती भिवंडी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक़ कारण, येथील खासदार कपिल पाटील यांना उमेदवारी मिळते की नाही, येथूनच येथील निवडणुकीच्या चर्चेला सुरुवात झाली होती. शिवसेनेचे प्रमुख नेते सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी पाटील यांच्याविरोधात उघड बंड पुकारले. त्याला न जुमानता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मर्जी संपादन करून तिकीट मिळवण्यात पाटील यशस्वी झाले.
त्यानंतर, म्हात्रेंच्या बंडाला अधिक धार आली. यानंतर, म्हात्रेंनी काँगे्रसप्रवेशासाठीही भिवंडी महापालिकेतील काही काँगे्रस नगरसेवकांना हाताशी धरले. काँगे्रसने सुरेश टावरे यांंना उमेदवारी दिली, तर आम्ही प्रचार करणार नाही, असा पवित्रा या नगरसेवकांनी घेतला. मात्र, पक्षाने पक्षनिष्ठेला प्राधान्य देऊन टावरे यांची उमेदवारी घोषित केली. त्यानंतर, कुणबीसेनेचे विश्वनाथ पाटील यांनाच कपिल पाटील यांनी गळाला लावले.
विश्वनाथ पाटील यांनी कुणबीसेनेचा पाठिंबा कपिल पाटील यांना जाहीर केला. त्याचाही भाजपला लाभ झाला. मुरबाडमध्ये किसन कथोरे यांनी कपिल यांना चांगलेच मताधिक्य मिळवून दिले. तसेच बाळ्यामामाच्या बंडाचा बार फुसका ठरल्याचे भाजपला ग्रामीण भागात मिळालेल्या मतांवरून दिसते. भिवंडीतील मुस्लिम मतदारांनी कपिल पाटील यांचे मोठे मताधिक्य रोखले, अशी चर्चा आहे.