मनसेच्या दणक्यानंतर शिवसेनेने गुंडाळला मिसळ महोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 04:15 PM2020-03-14T16:15:59+5:302020-03-14T19:07:23+5:30
ठाणे जिल्हाधिकार्यांनी खबरदारी म्हणून गर्दी होईल अशा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले.
ठाणे- जगभरातील 'कोरोना' आजाराचे थैमानाचे लोण आता राज्यासह ठाण्यातही उमटत आहेत. त्यामुळेच मुख्यमंञी उध्दवजी ठाकरे यांनी १५ दिवसांसाठी व्यायामशाळा, जलतरण तलाव, माॅल,चिञपटगृहांवर सरसकट बंदी लागू केली. तर सर्व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनाही त्यांनी १५ दिवस नागरिक, मतदार किंवा लोकांचा जमाव एकत्र येऊन जमा होतील, अशा प्रकारचे कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असा आदेश दिला.
ठाणे जिल्हाधिकार्यांनी खबरदारी म्हणून गर्दी होईल अशा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले. तरीही ठाण्याच्या शिवाईनगर परिसरात दिशा ग्रुपचे भास्कर बैरीशेट्टी आणि त्यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका असणार्या पत्नी रागिणी बैरीशेट्टी यांच्या आर्शिवादाने पोखरण रोड येथील उन्नती गार्डन मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंञी महोदयांचे आदेश डावलून तीन दिवसीय मिसळ महोत्सावाचे आयोजन केले होते. माञ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या टीकेनंतर आयोजकांना मिसळ महोत्सवाचा गाशा गुंडाळावा लागला.
'कोरोना'चे सावट असताना नागरिकांचे जीव धोक्यात घालणार्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एकीकडे हिंदू नववर्षाच्या स्वागताचा मानबिंदू असणार्या जिल्ह्यातील गुढीपाडव्यानिमित्ताच्या शोभायाञांवर जिल्हाधिकार्यांनी बंदी घातलेली असताना व सातारा जिल्ह्यातील बावधनच्या पारंपारिक 'बगाड' याञेच्या आयोजनानिमित्त संबंधितांवर 'कोरोना' नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी खुद्द जिल्हाधिकारी कारवाईच्या तयारीत आहेत. असे असताना ठाण्यात सुरु असलेल्या मिसळ महोत्सवावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे
जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी सोशल मीडियावरुन आवाज उठवला. नेटकर्यांनी देखील त्याला तुफान प्रतिसाद देत महोत्सव रद्द करण्याची मागणी केली. अखेर जनक्षोभाच्या रेट्यामुळे आयोजकांनी शुक्रवारी उदघाटन केलेला महोत्सव शनिवारी दुपारी आवरता घेणे, पसंत केले.
मिसळ महोत्सव आमचा नाही, आयोजकांना फार आम्ही ओळखत नाही, आरोप करणार्याने जर शहानिशा न करता आमच्या नावाचा उल्लेख केल्यास मानहाणीचा दावा करणार. आम्हाला लोकांची काळजी आहे. आयोजक दुसरे आहाइत जर त्यांना सत्ताधारी पक्षाचे सहकार्य घेण्याची भावना आहे म्हणून आमचे सहकार्य घेतले आहे.
- भास्कर बैरीशेट्टी, अध्यक्ष, दिशा ग्रुप सामाजिक संस्था
रागिणी बैराशेट्टी आणि भास्कर बैराशेट्टी हे दोघे या महोत्सवाचे आयोजन आहे, त्यांचा दावा खोटा आहे. ते दोघे आयोजक आहे म्हणूनच बॅनर वर त्यांचे फोटो झळकत आहेत. विभागात चारही नगरसेवक सत्ताधारी पक्षाचे असताना या महोत्सवाच्या बॅनरवर दोघांचेच फोटो कसे? मुख्यमंत्री यांच्या पक्षाचे असताना ते आदेश देत असून हा महोत्सव होतोय तर याना मनसेने सांगण्याची काय गरज? ते फक्त सारवासारव करत आहेत.
- संदीप पाचंगे, मनसे