मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेची १०१ शाखा निहाय घरगुती श्री गणपती सजावट स्पर्धा; तब्बल ११ लाखांची बक्षिसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2023 12:46 PM2023-09-15T12:46:54+5:302023-09-15T12:47:01+5:30
शिवसेना पक्षाचे १०१ शाखा प्रमुख असून प्रत्येक शाखेच्या कार्यक्षेत्रात ही स्पर्धा होणार आहे.
मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये शिवसेना आणि आमदार प्रताप सरनाईक फाउंडेशन मार्फत १०१ शिवसेना शाखा निहाय घरगुती श्री गणपती सजावट दर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून तब्बल ११ लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत. इतक्या मोठ्या स्वरूपातील शहरातील हि पहिलीच गणपती सजावट स्पर्धा आहे.
शिवसेना पक्षाचे १०१ शाखा प्रमुख असून प्रत्येक शाखेच्या कार्यक्षेत्रात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १८ सप्टेंबर २०२३ पर्यंत नाव नोंदणी जवळच्या शिवसेना शाखेत, शाखा प्रमुखा कडे तसेच सरनाईक यांच्या मंगल नगर येथील जन संपर्क कार्यालयात करता येणार आहे . ही स्पर्धा फक्त मीरा भाईंदर शहरातील भक्तांसाठी आहे. शाखा क्षेत्र निहाय विजेत्यांना पहिले बक्षीस ५ हजार रोख, दुसरे ३ हजार रोख, तिसरे २ हजार रोख व उत्तेजनार्थ १ हजार रोख सह सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येईल. पर्यावरणस्नेही वस्तूंपासून केलेल्या सजावटीला तसेच इको फ्रेंडली मूर्ती किंवा आकर्षक मूर्ती असल्यास त्यांची विशेष नोंद घेतली जाणार आहे.
स्पर्धेत प्रवेश विनामूल्य आहे. स्पर्धकांनी काढलेले फोटो हे शाखेमध्ये स्वीकारले जाणार नाहीत. शाखा प्रमुख व त्याचे सहकारी नाव नोंदणी केलेल्या स्पर्धकांच्या घरी जाऊन सजावटी चे परीक्षण करतील आणि त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल. घरगुती गणेश सजावटीसाठी मेहनत घेऊन चांगले देखावे साकार करणाऱ्या गणेश भक्तांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आ. सरनाईक यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आली आहे . त्यात सर्व भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सचिन मांजरेकर आणि विक्रमप्रताप सिंह यांनी केले आहे .