मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेचे राणेंविरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:45 AM2021-08-25T04:45:14+5:302021-08-25T04:45:14+5:30
मीरारोड - भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आपत्तीजनक वक्तव्याचे पडसाद मंगळवारी ...
मीरारोड - भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आपत्तीजनक वक्तव्याचे पडसाद मंगळवारी मीरा-भाईंदरमध्येही उमटले. शहरात शिवसेनेच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलने होऊन राणे यांचा निषेध करीत गुन्हा दाखल करा, अशा लेखी तक्रारी पोलिसांत देण्यात आल्या.
नारायण राणे यांनी, ‘मी तिथे असतो तर मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारली असती’, अशा आशयाचे वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ मीरा-भाईंदर शिवसेनेने शहरात आंदोलने केली. मंगळवारी मीरारोडच्या हटकेश भागात शाखाप्रमुख महेश शिंदेंसह पदाधिकारी व शिवसैनिकांनी राणे यांच्या निषेधार्थ आंदोलन केले. राणे यांना ‘कोंबडीचोर’ लिहिलेले फलक दाखवून त्यावर काळे फासले. महिलांनी फलक पायदळी तुडवत, चपलेने मारीत आपला संताप व्यक्त केला. काशीमीरा येथे शहरप्रमुख जयराम मेसे व शिवसैनिकांनी आंदोलन केले व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी केली.
भाईंदर पश्चिमेस शिवसेना शहर शाखेसमोर शिवसेना जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, गटनेत्या नीलम ढवण, महिला संघटक स्नेहल सावंत, नगरसेविका तारा घरत, पदाधिकारी प्राची पाटील, आदींसह अन्य पदाधिकारी यांनी राणेंविरोधात घोषणाबाजी केली. राणेंच्या प्रतिमेस जोड्याने मारून संताप व्यक्त केला गेला.
कोंबडीचोर नाऱ्याचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धार करून त्यांना ‘नारायणराव’ बनवत मुख्यमंत्री केले. शिवसेनेमुळे मोठे झाल्याची जाणीव नसणाऱ्या राणेंना भाजपने केवळ भुंकण्यासाठी मंत्रिपद दिले आहे का? असा सवाल गटनेत्या नीलम ढवण यांनी केला.