खडी खदान येथील डम्पिंग हटवण्यासाठी शिवसेनेचे आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:43 AM2021-08-19T04:43:26+5:302021-08-19T04:43:26+5:30
उल्हासनगर : कॅम्प नं. ५मधील खडी खदान येथील डम्पिंग ग्राऊंड हटविण्यासाठी शिवसेनेने मंगळवारी आंदोलन केले. महापालिकेत सत्ताधारी असणाऱ्या शिवसेनेवर ...
उल्हासनगर : कॅम्प नं. ५मधील खडी खदान येथील डम्पिंग ग्राऊंड हटविण्यासाठी शिवसेनेने मंगळवारी आंदोलन केले. महापालिकेत सत्ताधारी असणाऱ्या शिवसेनेवर डम्पिंग हटविण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आल्याची टीका होत आहे, तर उसाटणे गाव हद्दीतील पर्यायी डम्पिंग ग्राऊंडला भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी विरोध केला आहे. त्यामुळे आता डम्पिंग ग्राऊंडवरून भाजप - शिवसेनेत सामना रंगल्याचे दिसत आहे.
खडी खदान येथील डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लो झाले आहे. दुर्गंधी आणि वारंवार लागणाऱ्या आगीच्या धुराने हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे हे डम्पिंग हटवण्याची मागणी करून सत्ताधारी शिवसेनेने मंगळवारी आंदोलन केले. आंदोलनात शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, महापौर लीलाबाई अशान, शिवसेना नेते धनंजय बोडारे, उपशहरप्रमुख अरुण अशान, राजेंद्र शाहू, संदीप गायकवाड यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व शिवसैनिक सहभागी झाले हाेते.
शासनाने महापालिकेला डम्पिंग ग्राऊंडसाठी उसाटणे गाव हद्दीत एमएमआरडीएच्या ताब्यातील ३० एकर जागा दिली आहे. महापालिकेने राज्य शासनाकडे डम्पिंग ग्राऊंडसाठी पर्यायी जागेची मागणी केली हाेती. दरम्यान, पालिका कर्मचारी हे पोलीस संरक्षणात डम्पिंगच्या पर्यायी जागेला कुंपण घालण्यासाठी गेले असता स्थानिक नागरिकांनी विरोध केला. तसेच भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे स्थानिकांच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे शिवसेनेने आता शहरातील डम्पिंग हटवून उसाटणे येथील जागेवर डम्पिंग सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे. पालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेवरच डम्पिंग हटविण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आल्याने टीका होत आहे.
चौकट :
‘उसाटणेबाबत भूमिका स्पष्ट करा’
महापालिकेसह राज्यात शिवसेना सत्तेत आहे. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे असताना शिवसेनेला आंदोलन करावे लागत असल्याकडे लक्ष वेधत भाजपने टीका केली आहे. उसाटणे येथील डम्पिंग ग्राऊंडला भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी विरोध केला आहे. मात्र, शिवसेना याबाबत आपली भूमिका स्पष्ट करीत नसून, उसाटणे येथे कचरा प्रक्रिया केंद्र सुरू का करीत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.